>> गिरी येथील घटना; 1 कामगार ठार
गिरी-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाचा संरक्षण कठडा तोडून एक कचरावाहू ट्रक थेट खालच्या सर्व्हिस रोडवर कोसळला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने काल पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रकमधील समलॉन हेम्ब्रोम (29, मूळ रा. झारखंड) कामगार ठार झाला, तर चालकासह 4 जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, सदर ट्रक थिवीतून पणजीच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक महामार्गावरील दुभाजक तोडून दुसऱ्या एकेरी मार्गिकेतून पुढे जात रस्त्याच्या बाजूच्या संरक्षक कठड्याला (रेलिंग) ठोकर दिली. तेवढ्यावरच न थांबता हा ट्रक उड्डाण पुलावरून खाली डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर कोसळला. या अपघातात ट्रकमधील कामगार समलॉन हेम्ब्रोम याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकमधील प्रमेशल मरांडी (21), सौग्रेडा मरांडी (18), बुराम मी (18) (सर्व रा.थिवी, व मूळ रा. झारखंड) हे जखमी झाले. तसेच ट्रकचालक बनरा (सध्या रा. थिवी व मूळ रा. पश्चिम बंगाल) हा देखील जखमी झाला. म्हापसा पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.