केपे मतदारसंघात पल्लवी धेंपो यांना मोठी आघाडी द्या

0
10

>> माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे आवाहन

>> केपे मतदारसंघात भाजपच्या प्रचार बैठका

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून केपेसारख्या भागात विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला हक्काचा खासदार आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर येथील समस्या मांडण्यासाठी सक्षम असा खासदार गरजेचा आहे. यासाठी आम्ही सर्वांनी हेवेदावे विसरून भाजपाच्या दक्षिण गोवा मतदार संघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. केपे मतदार संघातून भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी मिळवून द्या, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केले.

भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी केपे मतदार संघात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सौ. सावित्री कवळेकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष कुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, संजना वेळीप, दीपक बोरकर, सरपंच भूपेंद्र गावस देसाई, पंच विन्सेंट डायस, इमॅक्युलेट फर्नांडिस, सिद्धार्थ कालेकर, संतोष प्रभुदेसाई तसेच मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, माजी सरपंच आलेलुईया आफोंसो, सरिता नाईक, माजी नगराध्यक्ष नाना गावकर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समस्या सोडवण्यास प्रामाणिक प्रयत्न करणार : पल्लवी धेंपो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी भाजपाला मतदान करावे असे आवाहन दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी केले. दक्षिण गोव्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले. जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे केंद्र उपलब्ध व्हावे या हेतूने निवडून आल्यानंतर दक्षिण गोव्यात स्वतंत्र कार्यालय खुले केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केपे मतदार संघातील प्रचार दौऱ्याची सुरूवात अवडे येथील मिनी मार्केटमधील सभेने करण्यात आली. यानंतर सौ. धेंपो यांनी कट्टा आमोणा जंक्शन, श्री पाईक देव सभागृह पाड्डा, शिरवळ या ठिकाणी कोपरा बैठकांत जनतेला संबोधित केले. दुपारनंतर नवे खोला, श्री आदिनाथ सभागृह माटवे – खोला, श्री विठ्ठल रखुमाई सभागृह साळेरी, श्री महादेव मंदिर बार्से तसेच श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोरपिर्ला येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. केपे मतदार संघातील प्रचार दौऱ्यावेळी सौ. धेंपो यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी भाजपाला मतदान करून मोदींचे हात बळकट करावे. दक्षिण गोव्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे केंद्र उपलब्ध व्हावे या हेतूने निवडून आल्यानंतर दक्षिण गोव्यात स्वतंत्र कार्यालय खुले करणार आहे.

  • सौ. पल्लवी धेंपो, भाजप उमेदवार