पायांवरील निळ्या-जांभळ्या नसा

0
33
  • डॉ. मनाली महेश पवार

चाळीशी ओलांडली म्हणजे पीसीओडी/पीसीओएस, वजनवाढ, कंबरदुखी इत्यादींबरोबर अजून एक त्रास मुख्यत्वे करून स्त्रियांमध्ये उद्भवतो, तो म्हणजे, पायांवर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या नसा दिसू लागतात. या नसा काहीजणींच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात, तर काहीजणींमध्ये आरोग्याचा प्रश्नही निर्माण करतात. अशा या ‘व्हेरिकोज व्हेन्स’बाबत विशेष माहिती-

चाळीशी ओलांडली म्हणजे पीसीओडी/पीसीओएस, वजनवाढ, कंबरदुखी इत्यादींबरोबर अजून एक त्रास मुख्यत्वे करून स्त्रियांमध्ये उद्भवतो, तो म्हणजे, पायांवर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या नसा दिसू लागतात. या नसा काहीजणींच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात, तर काहीजणींमध्ये आरोग्याचा प्रश्नही निर्माण करतात. यांना ‘व्हेरिकोज व्हेन्स’ असे म्हणतात.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
हा शरीराच्या रक्ताभिसरण क्रियेमधल्या अडथळ्यामुळे होणारा आजार आहे. शुद्ध रक्त शरीरात पोचवण्यासाठी आर्टरी नावाच्या शिरा असतात, तर अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी व्हेन्स असतात. पायाकडून अशुद्ध रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने हृदयाकडे पोचवावे लागते म्हणून व्हेन्समध्ये विशिष्ट प्रकारच्या झडपा असतात ज्याला ‘व्हॉल्व’ म्हणतात. या झडपांमुळे रक्त उलटे मागे येत नाही. जर या झडपांचे कार्य नीट झाले नाही तर साहजिकच पायांवर ताण येतो व रक्त साठण्याला सुरुवात होते आणि मग हळूहळू व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे दिसू लागतात.

सतत उभं राहून काम करणारी लोकं, जसं की- गृहिणी, शिक्षक, ट्राफिक पोलिस, नर्स, कूक इत्यादींमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा धोका अधिक संभवतो. आता बदलत्या लाइफस्टाइलमुळे साधारण चाळीशीच्या अगोदरच अनेकांना व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • प्रमुख कारणे ः
  • अनुवंशिकता म्हणजे कौटुंबिक इतिहास.
  • पेल्विसमध्ये ट्यूमर किंवा रक्तवाहिन्यांमध्ये आधीच रक्ताच्या गुठळ्या असण्यासारखे दुर्मीळ आजार.
  • गरोदरपणात सातत्याने धूम्रपान, व्यायामाचा अभाव.
  • व्यावसायिक म्हणजे बराच वेळ उभं राहून काम करणारे. उदा. पेंटर, कंडक्टर्स, शिक्षक वगैरे. त्याचप्रमाणे सतत उभे राहून काम करणाऱ्या स्त्रिया, उंच टाचांच्या चपलांचा वापर.
  • सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पोटाची घेरी वाढणे. कंबरेखाली वाढलेले वजन, साचलेली चरबी, पोटात गॅस होणे म्हणजेच कुठल्याही प्रकारे पोटावर ताण असणे.
  • व्हेरिकोज व्हेन्समध्ये दिसणारी लक्षणे ः
  • अशुद्ध रक्त साठल्याने शिरा फुगीर होणे.
  • काळ्या-निळ्या नसा दिसणे.
  • पायाला जडत्व येणे.
  • पायात चमक असणे.
  • पायात असह्य वेदना होणे.
  • पोटऱ्या दुखणे.
  • घोट्याला व पायाला सूज येणे व काळवंडणे.
  • कधीकधी शिरांमधून रक्तस्त्रावही होतो.
  • गंभीर त्रासामध्ये जखम होऊन अल्सर होतो.
  • निदान ः व्हेरिकोज व्हेन्सच्या निदानासाठी ‘डॉपलर स्कॅन’ करून घ्यावा. रक्तवाहिन्यांच्या डॉपलर स्कॅनद्वारे छोट्यातल्या छोट्या रक्तवाहिन्यांतील समस्या दिसून येतात.
  • व्हेरिकोज व्हेन्सची काळजी व उपाय ः
    व्यायाम ः
  • नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे पायाच्या रक्तवाहिन्यांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले दूषित रक्त पुढे ढकलण्यास मदत होते. व्यायामामुळे रक्तदाबही नियंत्रित होतो.
  • पोहणे, चालणे, सायकल चालवणे, योगासने अशा प्रकारचा व्यायाम करणे. योगासनांमध्ये उत्कटासन, सर्वांगासनसारखी योगासने करावी.
    1) पाठीवर झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडून घ्या. दुसरा पाय सरळ रेषेत वर आणा. मात्र पाय वर आणताना घोट्यातून पाय तुमच्याकडे खेचून घ्या म्हणजे पायाचा पंजा वर येईल. हा व्यायाम 10 वेळा एका पायाने व 10 वेळा दुसऱ्या पायाने करा.
    2) पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा. हळूहळू दोन्ही पाय वर उचलून सायकल चालवतो तसा प्रयत्न करा. सुलटे 10 वेळा व उलटे 10 वेळा असा हा व्यायाम करा.
    3) उभे राहून पायांच्या टाचा वर-खाली करा. 10 वेळा हा व्यायाम करावा.
    4) उभे राहून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा व सरळ करा. मात्र हे करताना गुडघे पायांच्या बोटांच्या पुढे जाऊ देऊ नका. हा व्यायामसुद्धा दहा वेळा करा.
    5) एकाच ठिकाणी खूप वेळ बसू नका, तसेच उभेही राहू नका.

आहार ः

  • सोडियमयुक्त पदार्थ खाण्यामुळे त्रास वाढतो. त्यामुळे आहारातून मीठ कमी करा. म्हणजे लोणचे, पापड, खारवटलेले मासे, पॅकेटबंद पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड इत्यादी.
  • ज्या पदार्थांमध्ये जास्त पोटॅशियम आहे असे पदार्थ खावेत. जसे की पालेभाज्या, बदाम, मासे, बटाटा इत्यादी.
  • आहारात प्लेव्होमॅईड वाढवावे, ज्याने रक्ताभिसरण सुधारते. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहिल्यामुळे शिरांमध्ये साचलेले खराब रक्त प्रवाहित होते आणि पायांवरील ताण कमी होतो. यासाठी आहारात कांदा, पालक, ब्रोकोली, चेरीज, सफरचंद, द्राक्षे, लसूण यांचा समावेश वाढवावा.
  • नाचणी, ज्वारी, बाजरीसारखी धान्ये सेवन करावीत. भात कमी प्रमाणात खावा.
  • सगळ्या प्रकारच्या कडधान्यांच्या उसळी खाव्यात. विशेषतः मूग, मटकी व मसूर.
  • जास्त प्रमाणात फायबरयुक्त भाज्यांचे सेवन करावे म्हणजे बद्धकोष्टता होत नाही. सगळ्या पालेभाज्या व फळभाज्यांचा आलटून-पालटून उपयोग करावा.
  • टॉमेटो, हळद, पालक ही द्रव्ये दाहविरोधक आहेत म्हणून त्याचा सूज कमी करण्यासाठी उपयाग होतो.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
  • आरामदायी कपडे ः
  • अति तंग आणि घट्ट कपडे वापरण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहामध्ये अडचण येते. त्यामुळे आरामदायक व सैल कपडे वापरावे. चप्पलसुद्धा उंच टाचेची असू नयेत.
  • हालचाल ः
  • जास्त वेळ एका ठिकाणी बसून किंवा उभे राहू नये. यासाठी दर एक तासाने थोडे फिरणे आणि पाय मोकळे करण्याची सवय लावावी.
  • मालिश ः
  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे व्हेरिकोज व्हेन्ससाठी स्नेहन ही उपचारपद्धती आहे. तेलाने मालिश केल्यामुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. पायावर हळूवार मजास करावा. जास्त दाब देऊ नये. मालिशसाठी एरंडेलतेल, ब्राह्मीतेल, नारायण तेल, मंजिष्ठा आदी तेलाचा वापर करू शकता. वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
  • कम्प्रेशन स्टॉकिंग्ज ः
  • या स्टॉकिंग्जबाधीत पायावर दाब देतात, त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारला जातो.
  • व्हेरिकोज व्हेन्सवर योग्य उपचार न केल्यास हा आजार वाढत जातो.
  • स्पायडर व्हेन्स यामध्ये फुगलेल्या रक्तवाहिन्या पायामध्ये कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात. या पायरीवरच जर आपण सतर्क झालात व उपचार घेतलेत तर आजार पुढे वाढत नाही.
  • व्हेरिकोज व्हेन्समध्ये वाहिन्यांना दोरखंडासारखा आकार आलेला असतो आणि त्या फुगलेल्या असतात. तसेच त्वचेमधून बाहेर आल्यासारख्या वाटतात. या पायरीदरम्यान योग्य उपचार केल्यास गंभीरता टाळता येते.
  • पायाची सूज ः यामध्ये घोट्याला सूज येते. त्वचेला खाज येते, गंभीर वेदना होतात व पेटके येतात.
  • त्वचेमध्ये बदल ः जसजसा या वाहिन्यांचा आजार वाढत जातो, तसतसे वाहिन्यांमधून रक्त बाहेर लीक व्हायला सुरुवात होते आणि हे रक्त टिश्यूमध्ये साचून तिथला त्वचेचा रंग बदलतो.
  • लेग अल्सर ः या आजाराची शेवटची पायरी म्हणजे पायाला अल्सर होणे. यामध्ये अतिशय तीव्र वेदना होतात. खास सुटते.

म्हणूनच व्हेरिकोज व्हेन्समध्ये सौम्य लक्षणे दिसत असतात. उपचार, काळजी घ्यावी. आहार, विहार, विचाराने सर्वप्रथम वजन आटोक्यात आणायचा प्रयत्न करा. पोटावरची चरबी म्हणा, पोटातील गॅस म्हणा किंवा आतड्यातील मळ योग्य वेळी डिटॉक्स करून पोटावरचे वजन कमी करावे म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रियेला अडथळा येणार नाही व व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होणार नाही.