योगसाधना ः 643, अंतरंगयोग- 229
- डॉ. सीताकांत घाणेकर
आध्यात्मिक अभ्यास केला तर हेदेखील कळेल की आत्मा ही एक अद्भुत शक्ती आहे. सर्व शरीराचे व्यवहार ती चालवते. तसेच सगळी सृष्टी अद्भुतपणे व्यवस्थित चालते म्हणजे कुठली तरी शक्ती असायला हवी. त्या शक्तीलाच येथे परमात्मा म्हटले आहे.
आपल्यातील प्रत्येकजण विविध कार्यक्रमांना जातो. प्रख्यात व्यक्तींची प्रवचने, व्याख्याने ऐकतो. पण मुख्य गोष्ट म्हणजे, आपणातील किती जणांना ते ज्ञान आठवते? किती जणांच्या ते आचरणात येते? मग जीवन सुधारणार कसे? फक्त ऐकून? म्हणून काही थोडे मुद्दे तरी त्याचवेळी लिहायला हवेत. लगेच त्यांची उजळणी करून त्या विचारांचे मनन-चिंतन हवे. त्याशिवाय इतरांना सांगितले तर ते ज्ञान हळूहळू मनबुद्धीत रुजते. त्यातील थोड्या गोष्टी तरी आचरणात यायला लागतात.
बालपणातील माझे प्राथमिक शिक्षक म्हणत- ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे!’ तेव्हा ती मजा वाटायची. कारण सत्यसत्यता कळायची नाही. आता प्रौढपणात हे छोटेसे वाक्य किती सत्य होते याची प्रचिती येते. आम्ही प्रवचने ऐकतो, पण कितीवेळ आपले मन तिथे असते? ते तर माकडासारखे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सारखे उड्या मारीतच असते.
यासंदर्भात एका प्रख्यात व्याख्यात्याचे व्याख्यान आठवले. त्यांनी श्रोत्यांना एक छोटासा प्रश्न विचारला- ‘सत्य व भ्रम यांत फरक काय?’ काही व्यक्तींनी वेगवेगळी उत्तरे दिली. शेवटच्या प्रेक्षकांत बसलेला एक तरुण म्हणाला, ‘आपण जे बोलता ते सत्य आहे आणि तुम्हाला वाटते की आम्ही सगळे चित्त एकाग्र करून ऐकतो आहोत हा आपला भ्रम आहे.’ खरेच हे उत्तर अगदी खरे आहे.
अनेकवेळा आम्ही एखाद्या चांगल्या मुद्दावर टाळ्यादेखील वाजवतो. व्याख्यात्याला प्रतिसाद देतो. पण काही व्यक्ती इतर टाळ्या वाजवतात म्हणून त्यात सहभागी होतात; मुद्दा समजला म्हणून असेल असे नाही! ऐकले, वाचले ते आचरणात न आणल्यामुळे अनेकवेळा आपली विचित्र परिस्थिती होते. मला येथे एक गोष्ट आठवते ती अशी-
एक दिवस म्हणे एक संत नदीकिनारी पाण्याकडे बघत बसला होता. त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींनी त्याला विचारले- ‘अहो भाऊ, पुष्कळ वेळ झाला, तुम्ही इथेच बसला आहात ते कशासाठी?’ संत म्हणाला, ‘मला पैलतीरावर जायचे आहे. वाट पाहात आहे की या नदीचे पाणी केव्हा आटणार व मी चालत पलीकडे जाणार.’
काहीजण हसायला लागले, कारण हा तर शुद्ध वेडेपणा होता. असे केव्हा घडणारच नव्हते म्हणून तशी अपेक्षादेखील करायची नसते. त्यांनी संताला तसे सांगितलेदेखील.
संत शांतपणे म्हणाला, ‘ही गोष्ट मी तुमच्याकडूनच शिकलो. तुम्हीदेखील वाट बघता की केव्हा तुमच्या समस्या, संकटे संपतील व तुम्ही भगवंताची आठवण करणार, चांगली कर्मे करणार. जीवनात तर सुख-दुःखे, यश-अपयश, तुफाने येतच राहणार. पण आम्ही मन-बुद्धी शक्तिशाली बनवायची असते, आत्मशक्ती वाढवायची असते हे तुम्ही विसरता.’ लोकांना सत्याचा संदेश मिळाला. आपणदेखील हा संदेश घेऊया. त्याप्रमाणे आपले जीवन बदलूया.
जीवन बदलण्यासाठी आत्मज्ञानाची अत्यंत गरज असते. येथे व्यक्ती अनेक गोष्टी शिकतात. त्यातील चार मुख्य गोष्टी म्हणजे- 1. समयाचा (वेळेचा) सदुपयोग, 2. संयम, 3. क्षमाशीलता, 4. वैराग्य.
यासंदर्भात एक छान गोष्ट आहे-
एका गावात एक ज्ञानी, सज्जन वृद्ध व्यक्ती होती. त्यांना चार मुले होती. जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्यांनी आपल्या चारही मुलांना आपल्याजवळ बोलावले. प्रत्येकाच्या हातात एक-एक चिठ्ठी दिली. पहिल्या तीन एक-एक करून उघडून वाचायला सांगितल्या व चौथीवर लिहिले होते की आपल्या अंत्यक्रियेनंतर ती वाचावी. त्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला.
1) पहिल्या चिठ्ठीत लिहिले होते- ‘समय’ कुणासाठीही थांबत नाही. तसेच किती वर्षे आपण जगणार हे कुणालाही माहीत नसते. म्हणून वेळेचा सदुपयोग करा. सत्कर्मासाठी वेळ द्या. गेलेली वेळ परत केव्हाही येत नसते.
2) दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले होते- जीवनात ‘संयम’ अतिमहत्त्वाचा आहे. अनेकवेळा आपल्याला अपयश येते. विविध गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. तेव्हा संयम बाळगून कार्य करायचे असते. सत्कर्म केले तर केव्हातरी यश मिळणारच. देवदेखील आपली परीक्षा बघतो.
3) तिसरी गोष्ट म्हणजे ‘क्षमाशीलता.’ जीवनात अनेक लोक आपल्याकडे चांगले वागत नाहीत. त्यांचे बोल, कर्म व्यवस्थित नसते. त्यांचा राग धरू नका. द्वेष करू नका. अगदी मनापासून त्यांना क्षमा करा. स्वतःचे संस्कार, चांगुलपणा सोडू नका. भगवंतावर विश्वास ठेवा. केव्हातरी ती व्यक्ती बदलेल यावर विश्वास ठेवा. मनाची शांती, सुख-समाधान लाभेल.
4) चौथ्या चिठ्ठीत लिहिले होते की, माझ्या आईने मला दिलेली जुनी शाल आहे. मला अग्नी देण्याआधी ती माझ्या अंगावर घाला. त्याप्रमाणे मुलांनी तसे केले. पण त्यावेळी जे जाणकार, ज्ञानी लोक होते त्यांनी मुलाला सांगितले की अशी जुनी भौतिक वस्तू प्रेतावर घालायची नसते. मुले सद्गुणी होती. त्यांनी त्यांचे ऐकले.
अंत्यक्रियेनंतर ते घरी आले. आंघोळ वगैरे झाल्यावर त्यांनी ती चौथी चिठ्ठी उघडली. तिच्यात लिहिले होते- ‘मानव आपल्या जुन्या भौतिक गोष्टी- धन, दौलत, घर… आपल्याबरोबर काहीदेखील नेत नाही. मी तर आईची जुनी शालदेखील जाताना नेऊ शकलो नाही. आत्म्याबरोबर फक्त त्याचे संस्कार व कर्म परलोकात जाते. यालाच ‘वैराग्य’ म्हणतात. म्हणून आताच तरुणपणात हा कर्मसिद्धांत जाणून घ्या व मनाशी पक्का करा. सर्वांचे कल्याण होईल.’
खरेच, या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहीत असतात; पण त्या आचरणात येत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपली आत्मशक्ती वाढवायची असते. त्यासाठी एक उत्तम शास्त्र म्हणजे- शास्त्रशुद्ध योग. योगाचे चार मार्ग व त्याचे विविध पैलू.
ही आत्मशक्ती योगसाधना करून परमात्म्याकडून मिळवायची असते. पण काही व्यक्ती परमात्मा- देव- भगवंत मानतच नाहीत. त्यांचे म्हणणे असते की, जे दिसत नाही ते मी मानत नाही. सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की जीवनात अनेक गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. उदा. हवा दिसत नाही, प्राणवायू दिसत नाही. पण अप्रत्यक्षपणे बघितले तर कळते की आपण जगतो म्हणजे हवा व प्राणवायू आहेत. तशीच विद्युत दिसत नाही. पण विविध उपकरणे चालतात म्हणजे विद्युत आहे. तसेच तारेला हात लावला तर झटका बसतो. पण विद्युत दिसत नाही.
हल्ली मोबाईल तर घरोघरी आहेत. ते विद्युत-चिंबकीय शक्तीवर चालतात. पण ती शक्ती दिसत नाही. पण साधन चालते म्हणजे काहीतरी अदृश्य शक्ती आहे. आध्यात्मिक अभ्यास केला तर हेदेखील कळेल की आत्मा ही एक अद्भुत शक्ती आहे. सर्व शरीराचे व्यवहार ती चालवते. तसेच सगळी सृष्टी अद्भुतपणे व्यवस्थित चालते म्हणजे कुठली तरी शक्ती असायला हवी. त्या शक्तीलाच येथे परमात्मा म्हटले आहे.
भले ती शक्ती दिसो अथवा न दिसो, कुणी मानो न मानो, विपरित ज्ञानाला उपाय काय? योगसाधकांचा तसा अभ्यास आहे. ते तर मानतीलच.