>> लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उत्तरेत भाजप-कॉँग्रेस-आरजीपीमध्ये, तर दक्षिणेत भाजप-काँग्रेसमध्येच लढत
राज्यातील लोकसभेच्या दोन जागांवर होणाऱ्या निवडणूक लढतींचे चित्र काल स्पष्ट झाले. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांतून प्रत्येकी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. उत्तर गोव्यातून 3 अपक्षांसह 5 विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. दक्षिण गोव्यातून 3 अपक्षांसह 5 विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर गोव्यात भाजप-कॉँग्रेस-आरजीपी यांच्यात, तर दक्षिण गोव्यात भाजप आणि कॉँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक, कॉँग्रेसचे रमाकांत खलप, आरजीपीचे तुकाराम परब यांच्याबरोबर बहुजन समाज पक्षाच्या मीलन वायंगणकर, अखिल भारतीय परिवार पक्षाचे सखाराम नाईक, अपक्ष शकील शेख, अपक्ष थॉमस फर्नांडिस, अपक्ष विशाल नाईक निवडणूक रिंगणात आहे. त्यापैकी खरी लढत भाजप, कॉँग्रेस आणि आरजीपी यांच्यात होणार आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपच्या पल्लवी श्रीनिवास धेंपो, कॉँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, आरजीपीचे रुबर्ट परेरा, बहुजन समाज पक्षाच्या डॉ. श्वेता गावकर, भ्रष्टाचार निर्मूलन पक्षाचे हरिश्चंद्र नाईक, अपक्ष दीपकुमार मापारी, अपक्ष आलेक्सी फर्नांडिस आणि अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; मात्र या मतदारसंघात खरी लढत भाजप आणि कॉँग्रेस यांच्यातच होणार आहे.
राज्यातील उत्तर गोवा मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून, ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. भाजपने उत्तरेत प्रचार प्रमुख मंत्री रोहन खंवटे व आमदार केदार नाईक यांना नेमले असून, त्यांनी प्रचाराला गती दिली आहे.
दुसऱ्या बाजूला कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार रमाकांत खलप यांनी देखील प्रचार सुरू केला आहे. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही सहभाग घेतला आहे. खलप यांच्या प्रचाराची जबाबदारी पक्षाने आमदार ॲड. कार्लूस फेरेरा यांच्याकडे सोपवली असून, मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचाराकडे लक्ष दिले जात आहे. आरजीपीचे
प्रमुख तुकाराम ऊर्फ मनोज परब यांनीही मतदारसंघात प्रचार सुरू केला असून, कोपरा बैठका व अन्य माध्यमांतून त्यांचा प्रचार सुरू आहे.
राज्यातील दक्षिण गोवा मतदारसंघ सध्याच्या घडीला कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात विजय
मिळविण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण गोव्यात भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सातत्याने दौरा करीत आहेत. या मतदारसंघात पक्षाने प्रचार प्रमुख म्हणून आमदार दिगंबर कामत व आमदार उल्हास तुयेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण गोव्यातील भाजपचे मंत्री आणि आमदार सुद्धा प्रचारात सक्रिय झाले आहेत. या मंत्री-आमदारांकडून उमेदवार पल्लवी धेंपो यांच्यासमवेत नियोजनबद्ध प्रचारावर भर दिला जात आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दक्षिण गोव्यात आयोजित करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे या वेळेस दक्षिण गोव्यात विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
दक्षिण गोव्यातील कॉँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या प्रचारात इंडिया आघाडीचे आमदार आणि नेते उतरले आहेत. फर्नांडिस यांच्या प्रचाराची धुरा आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या खांंद्यावर आहे. पक्षाने त्यांना प्रचारप्रमुख म्हणून नेमले आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विविध कोपरा बैठका, सभा यांतून दक्षिण गोव्यातील उमेदवाराचा प्रचार चालवला आहे. त्यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांची देखील साथ मिळत आहे. परिणामी या मतदारसंघात चुरशीची लढत होणे अपेक्षित आहे.
तीन महिला निवडणूक आखाड्यात
राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी एकूण 3 महिला उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरल्या आहेत. दक्षिणेत दोन, तर उत्तरेतून एक महिला लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दक्षिणेतून पल्लवी धेंपो आणि श्वेता गावकर ह्या, तर उत्तरेतून मीलन वायंगणकर या महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पंतप्रधानांची दक्षिणेत 27 एप्रिलला सभा शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोव्यातील प्रचार दौरा जवळपास निश्चित झाला असून, सांकवाळमध्ये त्यांची शनिवार दि. 27 एप्रिल रोजी प्रचारसभा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पक्षाने देखील या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधानांची सभा होणार असल्याचे संकेत दिले होते.