कला अकादमी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

0
11

>> अवकाळी पावसामुळे पाणी साचून छताचा काही भाग कोसळला; नूतनीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या गोवा कला अकादमीमध्ये अवकाळी पावसावेळी झालेल्या पाणीगळतीमुळे छताचा (फॉल्स सिलिंग) काही भाग कोसळल्याने कला अकादमी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शनिवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे कला अकादमीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. त्यानंतर, सोमवारी सकाळी छताचा काही भाग कोसळल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कला अकादमीतील गळती आणि फॉल्स सिलिंगचा भाग क ोसळण्याच्या प्रकारामुळे कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कला अकादमीच्या छताचा काही भाग कोसळ्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने पत्रकारांनी कला अकादमीमध्ये धाव घेतली; मात्र तेथील सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना छत कोसळलेल्या भागात जाण्यास मज्जाव केला. कला अकादमीतील पावसामुळे झालेली पाण्याची गळती आणि फॉल्स सिलिंग कोसळलेल्या भागाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाच्या वेळी कला अकादमीच्या मुख्य थिएटर व इतर भागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती झाली होती. याच पाण्याच्या गळतीमुळे छताचा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कला अकादमीच्या मुख्य थिएटरमध्ये रविवारी ‘सुरा मी वंदिले’ हा कार्यक्रम पार पडला होता, त्यावेळी प्रेक्षकांना कला
अकादमीमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचे आढळून आले होते. तसेच मुख्य सभागृहात पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधीचा त्रासही प्रेक्षकांना सहन करावा लागला होता.

चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनकडून
तपासणी करा : गोवा फॉरवर्ड

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी राज्य सरकारने सुमारे 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. नूतनीकरणाच्या कामाला वर्ष सुध्दा पूर्ण झालेले नसताना पुन्हा एकदा छत कोसळल्याने कला अकादमी पुन्हा चर्चेत आली आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनकडून तपासणी करून घ्यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालणार : तानावडे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आपण कला अकादमीच्या छताचा भाग कोसळल्याप्रकरणी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंत्री गोविंद गावडेंचे ‘साबांखा’कडे बोट
कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जात आहे. वास्तू अजूनपर्यंत कला अकादमी प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आलेली नाही. त्यामुळे कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत साबांखाकडूनच माहिती जाणून घेण्याची गरज आहे. कला अकादमीच्या कामात असलेल्या काही त्रुटी साबांखाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या आहेत, असे कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.