>> विरियातो फर्नांडिस यांचे वादग्रस्त विधान
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी एका प्रचारसभेत वादग्रस्त विधान केले किंबहुना वादग्रस्त भाषणच त्यांनी केले. भारतीय राज्यघटना गोव्यातील जनतेवर जबरदस्तीने लादली, असे वादग्रस्त वक्तव्य विरियातो फर्नांडिस यांनी दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर बोलताना केले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
प्रचारादरम्यान विरियातो फर्नांडिस दक्षिण गोव्यात एक सभा घेतली. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले.
वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी हे गोव्यात आले होते, त्यावेळी गोवा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आम्हाला राहुल गांधींसोबत चर्चेसाठी निमंत्रण पाठवले. त्यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही त्यांच्यासमोर 12 प्रश्न मांडले. त्यात गोव्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व हा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांनी दुहेरी नागरिकत्वाचा विषय घटनात्मक आहे का? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर आपण हा प्रश्न घटनाबाह्य असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला; मात्र आपण हा मुद्दा त्यांच्यासमोर प्रखरपणे मांडला.
भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्त्वात आली, त्यावेळी गोवा स्वतंत्र भारताचा भाग नव्हता. गोवा मुक्त झाला तो 19 डिसेंबर 1961 मध्ये. त्यानंतर जी राज्यघटना देशात लागू झाली होती ती गोव्यातील जनतेवर लादली, ही बाब आपण राहुल गांधींच्या निदर्शनास आणून दिली, असे फर्नांडिस या सभेत म्हणाले.
विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निषेध केला. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काँग्रेसनेच गोवा मुक्तीसाठी 14 वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय घटनेची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे. काँग्रेसपासून आपल्या लोकशाहीला धोका आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.