लोकसभा निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सोमवारी बिनविरोध निवडून आले. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, गुजरातमधील 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये चूक होती. या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 8 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. त्यानंतर मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे माजी उपमहापौर दिनेश जोधानी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जात प्रस्तावकांच्या बनावट सह्या झाल्याची तक्रार केली होती.