गोव्यात प्रचाराची रणधुमाळी

0
25
  • गुरुदास सावळ

1999 मध्ये उत्तर गोव्यातून रमाकांत खलप व श्रीपाद नाईक यांची लढत झाली होती व नाईक यांनी बाजी मारली होती. आता 23 वर्षांनंतर हे गडी परत एकदा भिडत आहेत. यावेळी श्रीपाद नाईक यांच्यामागे ‘डबल इंजिन’ सरकारची प्रचंड शक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाच्या प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. ‘आरजी’वाले शनि ग्रहाच्या रूपाने काँग्रेसच्या मागे लागले आहेत. त्यामुळे आजमीतीला तरी ‘डबल इंजिन’वाले प्रचारात आघाडीवर दिसताहेत.

गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांकरिता मतदानाला आता 17 दिवस उरले आहेत. या 17 दिवसांत प्रचाराचा रथ कसा ओढायचा ही चिंता काँग्रेस नेत्यांना भेडसावत आहे; तर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोव्यातील जाहीर सभांनी भाजपाच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी लाभेल, असा दावा भाजप नेते करीत आहेत. भ़ाजपाच्या तुलनेत काँग्रेस उमेदवार आणि काँग्रेस नेते जाहीर प्रचारात बरेच कमी पडतील अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत.

काँग्रेस पक्षाची बँक खाती सक्तवसुली संचालनालयाने गोठवली आहेत. काँग्रेस पक्षाने या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले तेव्हा न्यायालयाने ही खाती खुली करण्याचा आदेश दिला नाही. मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत याप्रकरणी पुढे कारवाई करण्यात येणार नाही, या आश्वासनावर काँग्रेसला समाधान मानावे लागले. काँग्रेसची खाती सील केलेली असल्याने, तसेच निवडणूक बॉण्ड्स सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने काँग्रेस पक्षाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. याउलट सत्ताधारी भाजपा पक्षाची स्थिती आहे. हा पक्ष केंद्रात तसेच अनेक राज्यांत सत्तेत असल्याने पैशांची कमतरता भासणार नाही. जसजशी निवडणूक जवळ पोचेल तसतसा प्रचाराचा जोर वाढत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण गोव्यात, तर गृहमंत्री अमित शहा उत्तर गोव्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्याशिवाय इतर असंख्य नेते संपूर्ण गोवा पिंजून काढणार आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा तिकीट मिळणार नाही अशी हवा भाजपाच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी निर्माण केली. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीपाद नाईक यांना भरीव पाठिंबा दिला. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. लगेच त्यांनी प्रचार सुरू केला. दक्षिण गोव्यातून माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनाच तिकीट द्यावी अशी जोरदार शिफारस गोवा कोअर समितीने केली होती; मात्र श्रेष्ठींनी एका महिलेला ही तिकीट देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांची पत्नी पल्लवी धेंपो यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे लगेच त्यांनीही आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

दक्षिण गोव्यातील विद्यमान खासदार सार्दिन यांनी निवडणूक शर्यतीतून माघार घेण्यास नकार दिल्याने दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवाराबाबत घोळ निर्माण झाला. गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना तिकीट द्यावी असे राहुल गांधी यांचे मत होते, तर विरोधी पक्षनेते युरी आलेमांव व गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांचा विरोध होता. एखाद्या अल्पसंख्याक नेत्याला संधी द्यावी असा त्यांचा आग्रह होता. अखेर दाबोळी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. लगेच उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांचे नाव निश्चित झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या तारखेआधी काँग्रेसने प्रथमच आपला उमेदवार जाहीर करून नवा पायंडा पाडला आहे.

उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर लगेचच सत्ताधारी भाजपा व ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात विविध मंदिरांना व चर्चना भेटी देऊन केली. देवदेवता आणि सायबिणींचे आशीर्वाद घेऊन प्रचार चालू केल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रत्येक उमेदवाराला वाटत आहे. भाजपा व काँग्रेस उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. ही पहिली फेरी चालू असतानाच भाजपाचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी म्हापसा अर्बन बँक मोडीत काढण्यास काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप जबाबदार असल्याचा दावा करत दुखऱ्या नसीवर बोट ठेवले. रमाकांत खलप यांनी बँक मोडीत काढण्यास आपण जबाबदार नसल्याचा दावा करत या प्रश्नावर समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान भाजपला दिले. खलप यांचे हे आव्हान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले व म्हापसा अर्बन बँक प्रकरण अजून खुले असून कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते असा गर्भित इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधितांना दिला. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा अर्बन बँक घोटाळ्यात सुमारे 100 कोटी रुपये बुडाले आहेत याची जाणीव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांना आहे हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीची धुळवड संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व श्रीपाद नाईक यांनी या प्रकरणात लक्ष घालून रंजल्या-गांजलेल्या रयतेला पैसे परत मिळतील अशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य ठेवीदार करीत आहेत.

रमाकांत खलप जसे म्हापसा अर्बन बँक प्रकरणात फसले तसेच श्रीपाद नाईक हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिर प्रकरणात नाहक बदनाम झाले आहेत. महाशिवरात्री उत्सवात हरवळे परिसरातील इतर देवस्थानांच्या महाजनांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असे भंडारी समाजाचे म्हणणे आहे. या लोकांना सरकारने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असा भंडारी समाजाचा समज ़झाला. या प्रकरणात श्रीपाद नाईक यांनी समाजाला पाठिंबा दिला नाही असा समज भंडारी बांधवांचा झाला आहे. त्यामुळे बरेच भंडारी लोक श्रीपाद नाईक यांच्यावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार की काय हे सांगणे कठीण आहे.

श्रीपाद नाईक यांना तिकीट मिळणार नाही अशी हवा भाजपाच्या काही नेत्यांनी निर्माण केली तेव्हा या भंडारी लोकांनीच पक्षावर दडपण आणले होते. तेच नेते आता नाराज झाले आहेत. गोवा भाजपा कोअर कमिटीने दक्षिण गोव्यासाठी शिफारस केलेले उमेदवार निवडून येतीलच याची हमी नसल्याने महिला उमेदवार देण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला. श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी खूष झाल्या. सौ. सुलक्षणा सावंत या विशेष हर्षभरीत झाल्या होत्या, कारण महिला उमेदवार बनण्यास त्या सर्वात सक्षम होत्या. मात्र पती मुख्यमंत्री असल्याने त्यांची संधी हुकली. भाजपाच्या कोअर कमिटीची खास बैठक घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेली महिला उमेदवार भाजपाकडे नसल्याचे कळविण्यात आले. मग पक्षात सक्रिय नसलेल्या महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला तेव्हा गोव्यातील सर्वात मोठे उद्योगपती, सामाजिक तसेच विविध धार्मिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले श्रीनिवास धेंपो यांची पत्नी सौ. पल्लवी धेंपो यांचे नाव पुढे आले. श्रेष्ठींना हे नाव पसंत पडले. भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी जीव तोडून त्यांच्यासाठी काम करीत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार नरेंद्र सावईकर यांना पराभूत करणारा मगो पक्ष या खेपेला भाजपापेक्षा अधिक आक्रमक बनला आहे. केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेतही सुदिन ढवळीकर हे रमाकांत खलप यांच्यावर तुटून पडले आहेत. दिगंबर कामत, रवी नाईक या भाजपा आमदारांबऱोबरच कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, चर्चित आलेमांव आदी बिगर भाजपा नेते पल्लवीसाठी काम करत आहेत. त्यामुळे दक्षिणेतील चित्र सध्या तरी भाजपाला फेव्हरेबल दिसत आहे.
कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे काँग्रेसचे उमेदवार नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे त्यांच्या प्रचाराला अजून जोर आलेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पुढील काही दिवसांत गोव्यात येणार असून त्यावेळी प्रचाराचा जोर वाढत जाईल असे दिसते.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सचिन पायलट आदी ज्येष्ठ नेते सक्रिय झाल्यावर काँग्रेसचे चित्र बरेच सुधारेल असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. आम आदमी पार्टी तसेच गोवा फॉरवर्ड पार्टी नेतेही सक्रिय आहेत. मात्र शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लागणारा मोठा जनसमुदाय गोळा करणे काँग्रेसला जड जाणार आहे. गोव्यातील लोकसभा मतदारसंघ छोटे असले तरी किमान 20 कोटी तरी लागणार. काँग्रेस पक्षाची बँक खाती सक्तवसुली संचालनालयाने गोठवली आहेत. काँग्रेसकडे राज्य सरकारेही नाहीत. त्यामुळे प्रचाराचा रथ चालू ठेवण्यासाठी लागणारा निधी कुठून आणायचा ही काँग्रेसची सर्वात मोठी समस्या आहे.

गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत काही अपक्ष उमेदवार उभे असले तरी ते केवळ नावालाच उमेदवार असतील. खरी लढत भाजपा, काँग्रेस आणि आरजी या तीन पक्षांच्या उमेदवारांमध्ये होईल हे उघड आहे. गोव्यात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतून मुकुंद शिंक्रे (मगो )आणि उत्तरेतून प्रजा समाजवादी पक्षाचे पीटर आल्वारिस हे उमेदवार मगो पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. त्यानंतर दक्षिण गोव्यातून ‘यूजी’ पक्षाचे एराजमो सिक्वेरा दोनदा तर काँग्रेसचे एदुआर्द फालेरो सतत पाचदा निवडून आले. रमाकांत आंगले व नरेंद्र सावईकर हे भाजपचे दोन उमेदवार निवडून आले. उत्तरेत भाजपाचे श्रीपाद नाईक यांनी सतत पाच वेळा निवडून येऊन विक्रम नोंदविला आहे. आता ते सहाव्यांदा आपले नशीब अजमावत आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मगो पक्षातर्फे निवडून येऊन केंद्रीय कायदामंत्री बनलेले रमाकांत खलप रिंगणात आहेत. 1999 मध्ये उत्तर गोव्यातून रमाकांत खलप व श्रीपाद नाईक यांची लढत झाली होती व नाईक यांनी बाजी मारली होती. आता 23 वर्षांनंतर हे गडी परत एकदा भिडत आहेत. यावेळी श्रीपाद नाईक यांच्यामागे डबल इंजिन सरकारची प्रचंड शक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाच्या प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. ‘आरजी’वाले शनि ग्रहाच्या रूपाने काँग्रेसच्या मागे लागले आहेत. त्यामुळे आजमीतीला तरी डबल इंजिनवाले प्रचारात आघाडीवर दिसताहेत.