>> विज्ञान 82.41, वाणिज्य 90.78, कला 86.66, व्यावसायिक 76.45 टक्के निकाल
>> यंदाही मुलींची बाजी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल काल (रविवारी) जाहीर करण्यात आला असून यंदा सरासरी निकाल 84.99 टक्के एवढा लागला आहे.
यंदा विज्ञान शाखेचा निकाल हा 82.41 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल हा 90.78 टक्के, कला शाखेचा निकाल हा 86.66 टक्के तर व्यावसायिक शाखेचा निकाल हा 76.45 टक्के एवढा लागला आहे. एकूण 17511 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 14884 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतून राज्यभरातून 5736 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून 5194 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 4715 जण उत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून 4156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 3588 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून परीक्षेला बसलेला 9235 मुलींपैकी 8132 मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ही 88.06 टक्के एवढी आहे. तर परीक्षेला बसलेल्या 8276 मुलांपैकी 6752 जण उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ही 81.59 टक्के एवढी आहे.
तालुकानिहाय निकाल
बार्देश तालुक्याचा निकाल हा 90.90 टक्के, डिचोली तालुक्याचा 87.70 टक्के, धारबांदोडा तालुक्याचा 63.44 टक्के, केप्याचा 81.19 टक्के, मुरगांवचा 83.72 टक्के, पेडण्याचा 81.11 टक्के, सासष्टीचा 88.09 टक्के, तिसवाडी 88.64 टक्के, फोंडा 78.32 टक्के, सांगे 89.73 टक्के, सत्तरी 66.06 टक्के तर काणकोण तालुक्याचा 85.79 टक्के एवढा निकाल लागला आहे, अशी माहिती काल गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पत्रकार परिषदेला मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक व उपसचिव भारत चोपडे हेही हजर होते.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2980 विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ मिळाला त्यापैकी 180 विद्यार्थी हे क्रीडा गुण मिळाल्याने उत्तीर्ण झाले. क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 2.26 टक्के एवढी आहे.
10 वर्षांतील कमी निकाल
यंदा लागलेला बारावीचा निकाल हा गेल्या 10 वर्षांतील सर्वांत कमी टक्केवारी देणारा निकाल ठरला असल्याची माहिती शेट्ये यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षी द्विसत्र परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. परंतु यंदा केवळ एकाच सत्रात ही परीक्षा घेण्यात आल्याचे ते म्हणाले. त्याचा परिणाम कमी निकाल लागण्यावर झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुलांचे अवांतर वाचन खूपच कमी झालेले असून विद्यालयात असलेल्या ग्रंथालयांचाही विद्यार्थिवर्ग म्हणावा तसा वापर करीत नसल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे. तेही हा निकाल कमी लागण्याचे एक प्रमुख कारण असावे असे शेट्ये यांनी स्पष्ट केले. आता विद्यार्थी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रीत (फोकस) करण्यात कमी पडू लागले आहेत. स्मार्ट फोनचा वापर विद्यार्थी नको तेवढा करू लागलेले असून समाज माध्यमांवर वेळ वाया घालवू लागले असल्याचे सांगून त्यामुळे त्यांचे लक्ष अभ्यासाकडून विचलीत होऊ लागले असल्याचे ते म्हणाले.
निकाल तीन तास उशिरा
शालान्त मंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार बारावीचा निकाल काल रविवारी दि. 21 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 5 वा. जाहीर केला जाणार होता. मात्र काही कारणामुळे तो जवळपास तीन तास उशिरा पुढे ढकलण्यात आला. बारावीच्या या निकालासंबंधीची पत्रकार परिषद काल संध्याकाळी 5 वा. सुरू होणार होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती रात्री 8 वा. सुरू झाली. द्विसत्र परीक्षा पद्धतीतून परत एकदा एकसत्र परीक्षा पद्धतीचा अवलंब केल्यानंतरचा हा पहिलाच निकाल होता आणि त्यामुळे सॉफ्टवेअरसंबंधीची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे निकालाला उशीर झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी सांगितले.