35 मद्यपी चालकांविरुद्ध गुन्हा नोंद

0
14

कदंबचालकाचाही समावेश; वाहतूक पोलिसांची मोहीम

राज्यात मद्यप्राशन करुन वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याच्या पार्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी काल विशेष मोहीम राबवली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी 35 अवजड वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विशेष म्हणजे त्यात एका कदंब बसचालकाचाही समावेश आहे.

शनिवारी कान्सा, थिवी येथे ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचालक सुजाता सूर्यकांत साळगावकर (25, रा. नास्नोडा) ही तरुणी ठार झाली होती. या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकचालक प्रमोद गावकर (रा. वाळपई) हा अपघाताच्या वेळी मद्याच्या नशेत होता आणि त्यातच त्याने दुचाकीला ठोकर दिली होती, असे पोलिसांना आढळून आले होते.

या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सोमवारी संध्याकाळपासून मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत अवजड वाहनचालकांवर खास लक्ष ठेवण्यात आले होते. या मोहिमेच्या वेळी सुमारे 35 अवजड वाहनचालक मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्यात एका कदंब बसचालकाचाही समावेश असून, या सर्वांविरुद्ध मोटर वाहतूक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.