वाडे – वास्को येथे पाच वर्षीय चिमुरडीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नरराक्षसांमुळे गोवा हादरला आहे. सभ्य, समृद्ध आणि सुसंस्कृत राज्य अशी प्रतिमा असलेल्या गोव्यामध्ये अशा प्रकारची घटना घडते हेच मुळात अतिशय अस्वस्थ करणारे आहे. प्रथमदर्शनी ह्या लांच्छनास्पद कृत्यात सदर इमारतीमध्ये काम करणारे बिगरगोमंतकीय कामगार गुंतलेले असावेत असा पोलिसांचा कयास असला, तरी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी अतिशय गरजेची आहे. झालेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहिले तर त्यामागील सडलेल्या, विकृत मनोवृत्तीची स्पष्ट कल्पना येते. पोलिसांनी तात्काळ हालचाल करून सुमारे वीस कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, परंतु ह्या गुन्ह्यामागे नक्की कोण आहे ह्याचा कसून शोध घेऊन पीडित बालिकेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात पोलिसांनी कोणतीही कसर सोडू नये. एक कोवळी कळी अशाप्रकारे नरराक्षसांकडून कुस्करली जावी ही घटना प्रत्येक गोमंतकीयाच्या काळजात कळ उठवणारी आहे. ह्या बालिकेवर आधी सामूहिकपणे लैंगिक अत्याचार झाले आणि नंतर तिचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या झाली असे शवचिकित्सा अहवाल दर्शवतो आहे. पोलिसांनी भारतीय बाल कायदा आणि ‘पोक्सो’ कायद्याखालीही संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे ह्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर सजा मिळेल अशी आशा वाटते. परप्रांतीयांच्या गोव्यातील वाढत्या लोंढ्यांबरोबर गोव्याचे समाजजीवन आमूलाग्र बदलून गेलेले आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही सातत्याने वाढते आहे. कधी कोणी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे गुन्हे गोव्यात सर्रास घडताना दिसत आहेत. खून, बलात्कारापासून गँगवॉरपर्यंतच्या घटना येथे घडू लागल्या आहेत. प्रत्येक गुन्हा रोखणे पोलिसांना शक्य नसते हे जरी खरे असले, तरी येथे कायद्याचे राज्य आहे हा संदेश गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत जाणेही तितकेच आवश्यक आहे. अनेक व्यवसायांच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजूरवर्ग गोव्यात येत असतो. वास्को परिसरात तर मूळ गोमंतकीयच दुर्मीळ होत चालल्याची स्थिती निर्माण होत चालली आहे, एवढे परप्रांतीयांचे प्राबल्य आहे. ज्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांनिमित्ताने हे परप्रांतीय येथे येतात, त्यामध्ये बांधकाम उद्योग हा एक प्रमुख उद्योग आहे. एखादी इमारत उभी राहते तेव्हा तिच्या बांधकामाच्या निमित्ताने मेसन, प्लंबर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर अशा आनुषंगिक व्यावसायिकांची गरज भासते. गोमंतकीय युवावर्ग अशा प्रकारची हलक्या दर्जाची कामे करण्यास तयार नसल्याने दूरदूरच्या परराज्यांतून हजारोंच्या संख्येने अल्पशिक्षित युवक गोव्यात रेल्वे भरभरून येत असतात. ते राहतात कोठे, जगतात कसे, करतात काय हे पाहण्याची गरज कोणाला वाटत नाही. आपण ज्यांना भाडेकरू म्हणून ठेवतो त्यांची संपूर्ण माहिती घेऊन ती पोलिसांना पुरवणे हा कायदा आहे, परंतु त्याचे कितपत कसोशीने पालन केले जाते? अशा मंडळींपैकी कोणी पूर्वाश्रमीचे गुन्हेगार तर नाही ना हे तपासले गेले पाहिजे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अशी पार्श्वभूमी तपासणे सहजशक्य आहे. यापैकी अनेकजण मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू शकतात. यापूर्वी सुरक्षारक्षक म्हणून गोव्यात काम करणारे काहीजण प्रत्यक्षात ईशान्येतील नक्षलवादी निघाले होते ही घटना तशी फार जुनी नाही. शिवाय गोवा म्हटल्यावर खा, प्या, मजा करा अशी प्रतिमा असल्याने आणि येथील रस्तोरस्ती मद्याचा महापूर वाहत असल्याने आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी ह्या पाहुण्यांची स्थिती होते. त्यातूनच गुन्हेगारी वाढते आहे. अलीकडच्या काळात तर विमानाने गोव्यात येऊन आलिशान गाड्यांतून फिरत चोऱ्या करणारे आधुनिक चोरही आढळून आले आहेत. त्यामुळे अर्थातच पोलिसांवरील जबाबदारी अधिक वाढते. वास्को येथे काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते, परंतु त्या प्रकरणाचा तपास अजूनही लागलेला नाही. तसे ह्या घटनेचे होणार नाही, ह्या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तीला कठोरातील कठोर सजा होईल आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेपासून धडा घेतला जाईल अशी आशा आहे. केवळ ह्या गुन्ह्यातील गुन्हेगार पकडले जाणेही पुरेसे नाही. हे जे कोणी नराधम आहेत, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची कठोरातील कठोर शिक्षा न्यायालयातही मिळेल आणि अगदी शेवटपर्यंत साक्षीपुरावे तेथे टिकून राहतील हे पाहण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे. दक्षिण गोव्याच्या कर्तबगार पोलीस अधीक्षक स्वतः एक महिला आहेत आणि ह्या बालिकेला न्याय मिळवून देण्यात त्या यत्किंचितही कसूर करणार नाहीत अशी आशा आम्ही करतो.