वाळपई व पणजी पोटनिवडणूक २३ ऑगस्ट रोजी

0
115

>> उत्तर गोव्यात आचारसंहिता तात्काळ लागू

पणजी व वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणूक ऐन गणेशचतुर्थीच्या काळात दि. २३ ऑगस्ट रोजी घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे कालपासून उत्तर गोवा जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून सरकारला कोणत्याही नवीन योजना किंवा नवे निर्णय घेता येणार नाहीत.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या दि. २९ ते ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असेल. दि. ७ रोजी अर्जांची छाननी होईल. दि. ९ ऑगस्ट ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून मतमोजणी २८ ऑगस्ट रोजी होईल.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रीकर राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे त्यांना मतदारसंघ रिक्त करून देण्यासाठी सिद्धार्थ कुंकळीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर भाजप प्रवेशासाठी कॉंग्रेसचे वाळपईचे आमदार म्हणून विश्वजीत राणे यांनी राजीनामा देऊन पर्रीकर सरकारात आरोग्यमंत्री झाले. त्यामुळे वरील दोन्ही मतदारसंघ रिक्त झाल्याचे निवडणूक आयोगाने जारी केले होते. वरील दोघाही मंत्र्यांना नियमानुसार राजीनामा दिल्याच्या दिवसापासून सहा महिन्यांच्या आत निवडून येणे आवश्यक आहे. त्यानुसार आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. आयोगाच्या स्थानिक कार्यालयाने दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची तयारी ठेवली होती.
पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पराभवासाठी बलाढ्य उमेदवार म्हणून सांताक्रूझचे माजी आमदार तथा गेल्या विधानसभा निवडणुकीतील पणजी मतदारसंघातील पडेल उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांना तयार ठेवले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर मोन्सेर्रात यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. वाळपईतून राणे यांच्या विरोधात रवी पुत्र रॉय नाईक यांचे नाव अग्रेसर आहे. पणजीसाठी कॉंग्रेस सद्या उमेदवाराच्या शोधात आहे. काल पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कॉंग्रसने उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. सद्यस्थितीत ऍड. सुरेंद्र देसाई व ऍड. सतिश नाईक यांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, वाळपईचे माजी आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विरुद्धचा अपात्रतेचा अर्ज सद्या मुंबई उच्च न्यायालयासमोर आहे. न्यायालयाने युक्तिवादाच्या वेळी वाळपईतील पोटनिवडणूक कधी घेणार हे कळविण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. राणे यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे न्यायालय कोणती भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणूक चतुर्थीनंतर घ्या ः गोसुमं
केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐन गणेशचतुर्थीच्या काळात दि. २३ ऑगस्ट रोजी वाळपई व पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केल्याने सरकारी कर्मचारी व मतदारांच्या गणेशचतुर्थीच्या उमेदीवर विरजण पडले आहे. त्यामुळे निवडणूक चतुर्थीनंतर घेण्याची मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी केली आहे. चतुर्थी हा गोमंतकीयांचा महत्त्वाचा सण असून या उत्सवाची तयारी सणाच्या चार दिवस पूर्वी होते व पुढील पंधरा दिवसपर्यंत राज्यात उत्सवाचे वातावरण असते, असे शिरोडकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाळपई व पणजी पोटनिवडणूक
सविस्तर कार्यक्रम
* निवडणुकीची अधिसूचना – २९ जुलै
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट
* अर्जांची छाननी – ७ ऑगस्ट
* अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट
* मतदान – २३ ऑगस्ट
* मतमोजणी – २८ ऑगस्ट