धर्मापूर-नावेलीत अपघातात दुचाकीचालक महिलेचा मृत्यू

0
7

धर्मापूर- नावेली या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या कदंब बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने प्रतिमा चव्हाण (रा. शिर्ली) ही दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. नंतर तिला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेत असताना मृत्यू झाला.

सदर कदंब बस कारवारहून मडगावच्या दिशेने येत होती. तर डिओ दुचाकी घेऊन प्रतिमा चव्हाण कुंकळ्ळीहून मडगावच्या दिशेने येत असताना धर्मापूर येथे थांबली होती. यावेळी कदंब बस भरवेगाने येत असताना समोरून येणाऱ्या एका वाहनाला वाट देताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि कदंबने डिओ दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात प्रतिमा ही कदंबच्या मागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. तर बस लगतच्या झाडीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतिमा हिला इस्पितळात नेताना वाटेत तिचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी कदंब चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

मुळगाव येथे अपघातात दुचाकीस्वार युवक ठार

मुळगाव डिचोली येथील नागदेवता मंदिराजवळ एका धोकादायक वळणावर झालेल्या स्वयंअपघातात अस्नोडा येथील शुभम बाणावलीकर (21) हा युवक ठार झाला. वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने सदर अपघात घडला.
काल बुधवारी 3 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वा. च्या सुमारास शुभम हा जीए 03 एएल 4499 या ॲक्टिवाने नानोडा येथून अस्नोडा येथे जात असताना नागदेवता मंदिराजवळील धोकादायक वळणावर ताबा सुटून दुचाकी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण बेरियर्सला धडकली. यात शुभम याचा जागीच मृत्यू झाला.