जनतेला २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून पाच नवी वीज उपकेंद्रे उभारण्यात येतील. त्यासाठीच्या निविदा येत्या पाच महिन्यांत काढण्यात येणार आहेत. मांद्रे, साळ, करासवाडा – म्हापसा, पणजी ईडीसी व पाटो या ठिकाणी ती उभारण्यात येणार असल्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल वीज खात्यावरील मागण्यांवर उत्तर देताना सांगितले.
२४ तास अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा उभारण्यास १५ हजार कोटी निधीची गरज आहे. मात्र, तेवढा निधी सरकारकडे नसल्याचे ते म्हणाले. वीजपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दीड हजार कोटी रु. खर्चून एरियल बंच केबल घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. टाटा पावर कन्सलटन्सी या कंपनीला राज्यातील वीज पुरवठ्यात सुधारणा करण्याची योजना तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. हे कंत्राट दीड हजार कोटी रु.चे असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील जुने वीज खांब बदलण्यात येणार असून लवकरच चाळीसही मतदारसंघांत प्रत्येकी ५० वीज खांब देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दक्षिण गोव्यातील बहुतेक किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागांतही भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुये येथे एक वीज उपकेंद्र उभारण्यात येणार असून तेथून नियोजित मोप विमानतळ व आयटी पार्कला वीज पुरवठा करण्यात येणार आहे. पणजी शहरात स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील वीज खांबांवर एलईडी दिवे बसवण्याचे काम येत्या गणेशचतुर्थीपर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.