काँग्रेसचा उमेदवार निवडीचा घोळ संपेना

0
10

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चेसाठी नवी दिल्ली येथे बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थिती लावली. तथापि, अजूनपर्यंत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही.

राज्यातील भाजप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या दोन पक्षांनी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, त्यांनी निवडणूक प्रचाराला सुध्दा सुरुवात केली आहे. तथापि, काँग्रेसमध्ये उमेदवारांची नावे निश्चित न झाल्याने निवडणूक प्रचार थंडावला आहे.

काँग्रेस पक्षामध्ये निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेक दावेदार आहेत. उत्तर गोव्यातून माजी खासदार रमाकांत खलप, विजय भिके यांच्याबरोबर सुनील कवठणकर सुध्दा इच्छुक आहेत. दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, एल्विस गोम्स, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, गिरीश चोडणकर इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचेही उमेदवारीसाठी नाव घेतले जात आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे दोन्ही उमेदवार निश्चित करण्यासाठी विलंब होत आहे.