वास्कोत आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह

0
248

 

>> सर्व तयारी पूर्ण
>> दिग्गज कलाकारांच्या मैफली रंगणार

वास्कोवासियांचे आराध्य दैवत श्री देव दामोदराच्या भजनी सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून आज षष्टीदिनी दुपारी १२ वा. श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर २४ तासांच्या अखंड श्री दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात होणार असून वास्को शहर भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. आज दुपारी जोशी कुटुंबियांतर्फे श्री देव दामोदरासमोर श्रीफळ ठेवल्यानंतर सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. यंदा अर्पिता वैशंपायन, स्वराली जोशी, सीमा दामले, राम देशपांडे, नसिंह साने, मुग्धा गावकर आदी नामवंत कलाकारांच्या मैफली रंगणार आहेत.
सात दिवस चालणार्‍या या सप्ताह काळात कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील महानगरपालिका, जिल्हाधिकारी, पोलिस खाते, वीज खाते तसेच इतर शासकीय अधिकार्‍यांची येथील उपजिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन सप्ताहाच्या पूर्वतयारीचा आढवा घेऊन सूचना करण्यात आल्या. दरम्यान, सप्ताहासाठी लागणारी फेरीची तयारी पूर्ण झाली असून येथील स्वतंत्रपथ मार्गावर मिठाई, लाकडी सामान, मुलांच्या खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने, प्लॅस्टिक सामान, भांड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.
सप्ताहासाठी येणार्‍या भाविकांच्या स्वागतासाठी ठक्कर हाऊसकडे मोठी कमान उभारण्यात आली असून ती संजय व श्रीपाद शेट्ये बंधुनी पुरस्कृत केली आहे. पोलिसांनी सप्ताह काळात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. वीज खात्यानेही वीज प्रवाह खंडित होणार नाही याची दक्षता घेतली आहे. दरम्यान, काल सकाळी जोशी कुटुंबीयातर्फे वार्षिक महारुद्र अनुष्ठान धार्मिक विधी संपन्न झाले. पुन:प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त सकाळपासून धार्मिक विधीनंतर संध्याकाळी अमेरिकास्थित मुंबई येथील प्रसिद्ध गायक कलाकार महेश काळे यांचे गायन झाले. त्यांनी भक्ती तसेच नाट्यगीते सादर करून मोठ्या संख्येने उपस्थित रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना राया कोरगावकर (ऑर्गन), महेश धामस्कर (हार्मोनियम), दयेश कोसंबे (तबला), दत्तराज शेट्ये (पखवाज), राहुल खांडोळकर (मंजिरी) या कलाकारांनी तितकीच सुरेख साथसंगत केली.
गोव्याबरोबरच शेजारच्या राज्यांत प्रसिद्ध पावलेल्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून आजपासून भाविकांची महासागर श्रींच्या दर्शनासाठी लोटणार आहे. प्रत्येक समाजाने आपल्या पार मिरवणुकीचीही तयारी पूर्ण केली आहे. याव्यतिरिक्त पार समितीतर्फे आयोजित गायक कलाकारांच्या बैठकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी खास मंडपही उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.