भाजपला पराभवाची भीती : पाटकर

0
17

>> 11 बँक खाती गोठवण्याच्या कृतीचा गोवा काँग्रेसकडून निषेध

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची 11 बँक खाती गोठवण्याच्या कृतीचा गोवा प्रदेश काँग्रेसने काल निषेध केला. आगामी निवडणुकीत भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारात अडचणी आणण्याचे भाजपचे लक्ष आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अलोकशाही मार्गांचा अवलंब केला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

2018-19 या आर्थिक वर्षासाठी 210 कोटी रुपयांच्या प्राप्तिकर मागणीवर खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेसची खाती गोठवून आणि जबरदस्तीने 115.32 कोटी काढून घेतले आहेत, असे पाटकर यांनी सांगितले.
भाजपसह कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही, तरीही काँग्रेसची 11 बँक खाती गोठवली आहेत. काँग्रेससमोर निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक अडचणी निर्माण करण्यासाठी बँक खाती गोठविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसला गेल्या आठवड्यात आयटी विभागाकडून आर्थिक वर्ष 1993-94 साठी नवीन नोटीस मिळाली. काँग्रेसला त्रास देण्यासाठी अशा कृती केल्या जात आहेत, असे पाटकर यांनी सांगितले.

काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने निवडणुकीसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लुस फेरेरा, ॲल्टन डिकॉस्टा आणि रमाकांत खलप उपस्थिती होते.