मोदींविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

0
14

>> टीएमसी खासदाराची आयोगाकडे तक्रार

>> प्रचारावेळी वापरले वायुसेनेचे हेलिकॉप्टर

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. आंध्र प्रदेशातील पलनाडू येथील लोकसभेची जागा असलेल्या चिलाकालुरीपेट येथील निवडणूक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप गोखले यांनी केला. आचारसंहितेच्या नियमांमध्ये निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा किंवा साधने वापरण्यास मनाई आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी 17 मार्चला पलनाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात एनडीएच्या निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. माध्यमांतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत होते.
निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता, याची आठवण देखील गोखले यांनी करून दिली.
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा सत्तेतील नेत्यांना सरकारी यंत्रणा आणि साधनांचा वापर करण्याची परवानगी नसते. इंदिरा गांधींना 1975 मध्ये विशेषत: याच कारणासाठी अपात्र ठरवले होते.