>> राहुल गांधी यांची भाजपवर टीका
>> भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप
आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीचा चेहरा समोर करण्यात आला आहे. आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, देशातील प्रत्येक संस्थेत आहे, ईडीमध्ये आहे, सीबीआय मध्ये आहे, आयकर विभागात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबई येथील शिवाजी पार्क येथे समारोप झाला. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीने या सभेतून फुंकले. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे 6,700 किलोमीटरचा प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली. त्यानंतर काल रविवारी राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर त्यांच्या यात्रेचा समारोप केला.
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी, नरेंद्र मोदी हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. ही यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल असे ठरवले होते. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल तर यात्रेचा समारोप धारावीत झाला म्हणून धारावीत यात्रेचा समारोप करत असल्याचे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन उपस्थित होते.
शरद पवार यांनी, भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशातील लाखो लोकांना भेटले. आजच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे देशात सध्या जी परिस्थिती आहे, यात बदल करण्याची गरज आहे. हा बदल आपण सर्व जण एकत्र येऊन आणू शकतो असे मत व्यक्त केले. ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी देशाला अनेक आश्वासने दिले. शेतकऱ्यांना, कामगारांना, तरुणांना, महिलांना, दलित आणि आदिवासी जनेतला अनेक आश्वासने दिली होती. मात्र कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही अशी टीका पवार यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे, फारूक अब्दुल्ला यांनीही विचार मांडले.