गडकरी, गोयल, खट्टर यांना उमेदवारी

0
14

>> लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 72 उमेदवारांची नावे घोषित

सत्ताधारी भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीत पक्षाने 72 उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यात 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि कर्नालमधून हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

यापूर्वी भाजपने 2 मार्चला 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश होता. त्यानंतर आता आठवड्याच्या आतच भाजपची दुसरी यादी आली आहे.
या यादीत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगण, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यातील उमेदवारांची नावे आहेत. तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील एक उमेदवारही जाहीर केला आहे. या यादीत 15 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह भाजपने देशभरातील इतर राज्यांमधील 52 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कर्नाटकमधील 20 उमेदवार, दिल्लीतील 2, गुजरातमधील 7, हरियाणातील 6, मध्यप्रदेशातील 5, तेलंगणातील 6, उत्तराखंडमधील 2, त्रिपुरातील 1, दादरा आणि नगर हवेलीमधील एक उमेदवार जाहीर केला आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनंगटीवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, जालन्यातून रावसाहेब दानवे यांनाही लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे. हिमाचलच्या हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांना तर, कर्नाटकच्या धारवाडमधून प्रल्हाद जोशी यांना निवडणूक आखाड्यात उतरवले आहे.

शिंदे, पवार गटाच्या वाट्याला किती जागा?
महाराष्ट्रातील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. मात्र त्याआधीच भाजपने कुरघोडी करत महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिंदे आणि पवार गटाची मोठी अडचण झाली आहे. आता आणखी किती जागा भाजप घेणार आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला किती जागा शिल्लक ठेवणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी उमेदवारी
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाचा मनोहरलाल खट्टर यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. हरियाणातील कर्नाल मतदारसंघातून त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मंगळवारी घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.

दक्षिणेतील उमेदवार अजूनही ठरेना

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांच्या नावांचा समावेश असलेली दुसरी यादी नवी दिल्ली येथे काल जारी केली; मात्र या दुसऱ्या यादीत देखील दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र ती फोल ठरली. दरम्यान, दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण गोव्यातील उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नसले तरी भाजपचे नेत्यांकडून कमळ ह्या निशाणीद्वारे प्रचार केला जात आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर होण्यास विलंबाबाबत चिंता करण्याची गरज नाही, असे सदानंद शेट तानावडे यांनी काल सांगितले.

दक्षिण आणि उत्तर गोव्यातील प्रचारप्रमुख नेमले
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघावर जास्त भर देण्याचा निर्णय घेतला असून, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांची प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच पक्षाने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि साळगावचे आमदार केदार नाईक यांची नियुक्ती केली आहे.