पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येत्या 1 एप्रिलपासून पणजी शहरातून कदंब महामंडळाच्या 60 बसेस धावू लागतील, अशी माहिती काल कदंब महामंडळातील सूत्रांनी दिली. या 60 बसेसच्या ताफ्यात मिनी बसेस तसेच मोठ्या आकाराच्या बसेस असतील. शिवाय इलेक्ट्रिक बग्गी देखील काही ठिकाणी येतील. पणजी शहरातून धावणाऱ्या खासगी सिटी बसेसच्या बदली या बसेसची सोय करण्यात येणार आहे.
राज्य वाहतूक खात्याने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. यासंबंधीच्या अधिसूचनेचा मसूदा गेल्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत सार्वजनिक करण्यात आला होता व जनतेकडून त्यासंबंधीच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या सूचनाही बससेवा सुरू करण्यासाठी विचारात घेण्यात आल्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या राज्यातील बसेस ह्या पणजी बसस्थानक ते मिरामार, दोनापावला, करंजाळे, बांबोळी, गोवा विद्यापीठ, कुजिरा, ताळगाव, सांतइनेज, सांताक्रूझ व आल्तिनो या मार्गावरून धावणार आहेत. या बसेससाठी क्यूआर कोड आधारित तिकिटे असतील. 10 ते 20 रुपयांपर्यंत तिकिटांचे दर असतील, अशी शक्यता आहे.