स्पाईस जेट एअरलाइन्सनेही आता दाबोळीऐवजी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कित्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी दाबोळीकडे पाठ फिरवून मोपा ह्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपली सेवा देण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ हा ‘घोस्ट’ विमानतळ होण्याची भीती दक्षिण गोव्यातील राजकीय नेते, पर्यटन व्यावसायिक व अन्यांनी व्यक्त केलेली आहे.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी या प्रश्नावरून विधानसभेत आवाज उठवला होता. दाबोळी विमानतळावर आवश्यक त्या सुविधा नसल्याने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता आपली विमानसेवा तेथून मोपावर वळवू लागली आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने दाबोळी विमानतळावर विमान कंपन्यांना हव्या असलेल्या सगळ्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली.