यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये काल पहाटे 4.30 वाजल्यापासून सुरू झाले. यंदाच्या ऑस्करवर कोणाचे नाव कोरले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हा पुरस्कार 23 श्रेणींमध्ये दिला जाणार होता, त्यामध्ये ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पटकावला. या चित्रपटाला विविध श्रेणींमध्ये 7 पुरस्कार मिळाले. ‘पूअर थिंग्स’ चित्रपटाने 11 पैकी 4 ऑस्कर जिंकले. या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर, तर एमा स्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
ख्रिस्तोफर नोलनने ‘ओपेनहायमर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. तसेच ओपेनहायमरला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा आणि फिल्म एडिटिंगचा ऑस्कर मिळाला.
‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर जिंकला. ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकला. 20 डेज इन मारियुपोलने या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा ऑस्कर जिंकला. ‘द लास्ट रिपेअर शॉप’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्मचा ऑस्कर मिळाला. ‘गॉडझिला मायनस वन’ ला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर मिळाला.
रॉबर्ट डाउनी ज्युनियर ‘ओपेनहायमर’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर दावाइन जॉय रँडॉल्फ हिला ‘द होल्डओव्हर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. ‘झोन ऑफ इंटरेस्ट’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘वॉर इज ओव्हर’ या चित्रपटाचा मिळाला.