भिकार्‍यांवर कारवाईसाठी कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव

0
132

 

>> पर्यटनमंत्र्यांची माहिती
दरवर्षी किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. परंतु तेथील फेरीवाले व भिकारी त्यांचा छळ करतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करता यावी म्हणून संबंधित कायद्यात दुरुस्ती करून ३४ कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल विधानसभेत मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले.
पर्यटन मास्टर प्लॅन व धोरण तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. गोवा हे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे गोव्याचे वैशिष्ट्य टिकवून ठेवले पाहिजे, त्या दुष्टीकोनातून आपण प्रयत्न करीत असल्याचे आजगावकर यांनी सांगितले. पर्यटन विकासासाठी केंद्राकडून शंभर कोटी निधी मिळाल्याचे सांगून अतिरिक्त शंभर कोटी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या निधीच्या माध्यमातून उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारी भागांचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वरील निधीचा योग्य पद्धतीने उपयोग न केल्यास निधी परत करावा लागतो. त्यामुळे सर्वांनी विकास प्रकल्पांच्या बाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. किनार्‍यांवर स्वच्छता व शांतता आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्यातील पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व हॉटेल्सचे नूतनीकरण करणार असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.