काँग्रेसची उमेदवारी कोणाला?

0
16

दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार निवडीबाबत संभ्रम कायम

काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावांची अजूनपर्यंत घोषणा केलेली नाही. दोन्ही जागांवर काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत पेच कायम असल्याने उमेदवार निवडीला विलंब होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चेसाठी कॉँग्रेसचे राज्य प्रभारी गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे चार दिवसापूर्वी बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला नावांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत होती. उमेदवार छाननी समितीच्या बैठकीनंतर लगेच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जाहीर केले होते. तथापि, बैठक होऊन कित्येक दिवस उलटले तरी उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही.

उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस पक्षाकडून दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाईल की नाही? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर इच्छुक आहेत. तसेच काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस हेही इच्छुक आहेत. दुसऱ्या बाजूला, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी इच्छुक महिला उमेदवारांची नावे पाठविण्याची सूचना केल्याने कॉँग्रेस पक्ष सुध्दा सावध बनला आहे.

उत्तर गोव्यातील काँग्रेसची उमेदवारीसाठी माजी खासदार रमाकांत खलप यांचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर गोव्यातून विजय भिके सुध्दा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. माजी आमदार नरेश सावळ यांनी कॉँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.