पुरातन वास्तू दर्शनासाठी शुल्क आकारण्याचा विचार

0
13

गोवा सरकारच्या प्रस्तावित वारसा धोरणामध्ये खासगी मालमत्तेतील वारसा वास्तूंच्या मालकांना आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद केली जाणार आहे. तसेच, राज्यातील पुरातन वास्तू पाहण्यासाठी शुल्क लागू करण्याचा विचार आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुरातत्त्व खात्याच्या सुधारित संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना पर्वरी येथे काल दिली. एकदा वारसा वास्तू अधिसूचित झाल्यानंतर अनेक निर्बंध लादले जातात. त्यामुळे खासगी मालक वास्तूला वारसा वास्तू म्हणून नोंदणी करण्याचे टाळतात. खासगी मालकांना त्यांच्या जागेतील वास्तूची नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले. राज्य सरकारच्या नवीन वारसा धोरणामध्ये अधिसूचित होण्यास पात्र असलेली सर्व पुरातन वास्तू आणि खासगी पुरातन वास्तू यांचा समावेश केला जाणार आहे. वारसा स्थळांना भेट देणाऱ्यासाठी शुल्क लागू करण्याचा विचार केला जात आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले. पुरातत्त्व खात्याच्या नवीन संकेतस्थळावर खात्याच्या विविध योजना, अधिसूचित पुरातन स्थळे, त्यांची छायाचित्रे व इतर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ होऊ शकतो, असेही फळदेसाई यांनी सांगितले.