भाव भक्ती फळे, भावे देव मिळे!

0
32

योगसाधना- 636, अंतरंगयोग- 223

  • डॉ. सीताकांत घाणेकर

नकारात्मक विचारांमुळे व्यक्तीची आत्मिक शक्ती कमी होते. त्यामुळे बौद्धिक, भावनिक व मानसिक शक्तीदेखील घटते. आज जे विविध मनोदैहिक रोग उच्चस्तरावर वाढले आहेत त्याचे एक कारण हेही आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये चार युगांचा उल्लेख आहे- सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग. सध्या कलियुग चालू आहे. कलियुगातील आजच्या काळाला वेगवेगळी नावे आहेत- अणुयुग, संगणकयुग, जेटयुग… अशी कितीतरी नावे- मुख्यत्वे विज्ञानाच्या प्रगतीप्रमाणे.
युगाचे व काळाचे नाव काहीही असले तरी जीवन मात्र धकाधकीचे आहे- समाजातील प्रत्येक घटकाचे- मग ती व्यक्ती खेड्यात असो वा शहरात, श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो अथवा अशिक्षित, कुठल्याही वयाची असो- प्रत्येकाची वेगवेगळ्या तऱ्हेने भागदौड चालू आहे. व्यक्ती किती वेगाने व कुठे पळते हे तिलाच ठाऊक. पण सगळेजण पळतात हे सत्य.

रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक घटना आठवते. ते ध्यानावस्थेत असताना म्हणे हसत राहायचे, केव्हा केव्हा तर नाचायचेही. आपल्या पत्नीला दुर्गामातेचे रूप मानून तिची पूजादेखील ते करीत. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसांना, जे भौतिकतेतच जास्त गुंततात अशांना असे वागणे जरा विचित्रच वाटते. म्हणून तर आध्यात्मिक अभ्यास व अनुभव आवश्यक असतो.
रामकृष्णांचे अनेक शिष्य होते- काही जुने तर काही नवे. जर विचार व ज्ञान पक्के नसेल तर असा घटना बघितल्यानंतर काहीजणांना संशय येतो- ही व्यक्ती वेडी तर नाही ना? असे म्हणतात की काही अपरिपक्व शिष्यांमध्ये चर्चा व्हायची. पण नक्की उत्तर सापडत नव्हते. काही शिष्य तर म्हणे विचार करायला लागले की, आपण आताच दुसरा चांगला गुरू बघितलेला बरा. कारण येथे राहिल्यामुळे आपले जीवन वाया गेले तर?
एक दिवस म्हणे त्यांनी त्यांच्यातील एका धीट शिष्याला विनंती केली की यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे गुरूंनाच याबद्दल विचारावे. त्याप्रमाणे त्या शिष्याने परमहंसांना त्यासंबंधी विचारले. आतून थोडी भीती होती- गुरू रागावले तर?
शिष्याचा प्रश्न ऐकून रामकृष्ण मंद हसले व म्हणाले की त्या व्यक्ती म्हणतात ते अगदी बरोबर आहे. पण हे सगळे विश्व म्हणजे वेड्यांचेच घर आहे. कलकत्त्यातील मुख्य रस्त्यावर सकाळी जाऊन बघ, सगळेच पळताहेत- मुख्यत्वे भौतिक गोष्टींमागे- धन, संपत्ती, नाव-प्रतिष्ठा, सत्ता… तर कुणी दुसऱ्या लिंगातील व्यक्तीमागे- पुरुष स्त्रीमागे व स्त्री पुरुषामागे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात हेच ध्येय असते. त्यांना वाटते की यामुळे सुख, शांती, खुशी मिळेल. त्यांना तशी प्राप्ती होतेदेखील. पण हे सर्व क्षणभंगुर आहे. यातील कुठलीही गोष्ट मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर जाणार नाही अथवा पुढील जन्मात प्राप्त होणार नाही.

शिष्य मन लावून ऐकत होते. रामकृष्ण पुढे म्हणाले की, मीदेखील या विश्वातील असाच एक वेडा आहे. मीदेखील पळतो. पण आमच्यात एक मुख्य फरक आहे व तो म्हणजे मी परमेश्वराची साधना करतो. मला जे सुख हवे ते इंद्रियसुख नाही; मला जो आनंद हवा तो परमानंद, चिदानंद आहे. या गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या आहेत. माझे सुख आत्मानंदामुळे आहे. त्यामुळे मी सदा हसतमुख असतो. परमानंदात रमल्यामुळे मी सहज नाचायला लागतो.

सगळे शिष्य अगदी शांत झाले. परमहंस म्हणाले की, मला फार बरे वाटले की तुम्ही मला याबद्दल विचारले. मला वाटते की तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला मिळाले. असेच निःशंक होऊन कार्य करणे आवश्यक असते. सर्वांचे कल्याण होते. तुम्ही सत्‌‍कर्म करत रहा.
खरेच, थोड्याशा शब्दांत परमहंसांनी जीवनाचे सत्य सगळ्यांना सांगितले आहे. आपल्यातील बहुतेकांना ते कळते पण म्हणतात ना- ‘कळते पण वळत नाही!’
कर्मफळाच्या संबंधात मला एक छान श्लोक आठवतो ः
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जनः स्मशाने।
देहः चितायाम्‌‍ परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवः एकः॥

  • धन भूमीमध्ये, पशू गोठ्यात, पत्नी गृहाच्या दारात, आप्तेष्ट स्मशानात, देह चितेपर्यंत… परलोकमार्गात जीव एकटाच जातो… कर्माबरोबर!
    स्मशानात जातेवेळी अंत्यक्रियेचे ते दृश्य पाहून थोडा वेळ स्मशान-वैराग्य अवश्य येते, पण तेदेखील क्षणभंगुरच असते.
    आपणातील अनेकजण विविध कार्यक्रमांना जातात- भजन, कीर्तन, प्रवचन, शिबिरे… त्याशिवाय आपण विविध ज्ञानपूर्ण पुस्तके वाचतो. आता तर विविध तऱ्हेने माहिती मिळवतो. पण मुख्य म्हणजे ते फक्त वाचण्यापुरते व ऐकण्यापुरतेच असते. ते ज्ञान आचरणात आणण्याचे शहाणपण बहुतेकांना नसते. म्हणून अष्टांगयोगातील सहावे अंग ‘धारणा’ आहे. आपल्याकडे जे आहे ते धारण करणे आवश्यक आहे. त्याने जीवनविकास होईल. परिवर्तन हवे, नाहीतर ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असे प्राथमिक शाळेतील आमचे गुरुजी म्हणायचे ते खरे ठरेल.

आपण पुष्कळ कष्ट करतो- पैसा व खुशीसाठी. काहींना पैसा भरपूर मिळतो; पण खुशी मिळत नाही. कारण किती पैसा मिळाला तर माणूस खूश होईल याचे मोजमाप नाही. उलट व्यक्तीची हाव संपतच नाही. त्यामुळे त्याला चिरकाल खुशी मिळत नाही.
अनेकांना वाटते की जर जग सुधारले म्हणजे इतर व्यक्ती, समाज सुधारला तर विश्वात खुशी नांदेल. शास्त्रकार सांगतात, जी गोष्ट, स्थिती बाहेर पाहिजे असे वाटते ती आपल्या अंतर्मनात तयार करायला हवी. यासाठी नकारात्मक विचार न करता सतत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. मनोतज्ज्ञ सांगतात की, एका दिवसात व्यक्तीच्या मनात तीस हजार ते पन्नास हजार विचार येतात. त्यांचे वर्गीकरण केले तर कळेल- गरज नसलेले विचार, चिंतेचे व ताणतणावाचे विचार, परत परत तेच विचार, भूत व भविष्यकाळातील विचार- यांच्यातील पंच्याण्णव टक्के विचार असे असतात की अशा विचारांचा काहीही उपयोग नाही. उलट ते नकारात्मक असल्यामुळे हानीकारक असतात. म्हणजे पाच टक्के विचारच सकारात्मक व उपयोगी असतात.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारांची जाण ठेवून व स्वतः अभ्यास करून ही टक्केवारी बघायला हवी. नकारात्मक विचारांमुळे व्यक्तीची आत्मिक शक्ती कमी होते. त्यामुळे बौद्धिक, भावनिक व मानसिक शक्तीदेखील घटते. आज जे विविध मनोदैहिक रोग उच्चस्तरावर वाढले आहेत त्याचे एक कारण हेच आहे.

यासंदर्भात एक गोष्ट आठवते-
एक महात्मा प्रवचन करताना म्हणे मध्ये मध्ये आरशात बघत होते. असे बघणे विचित्रच वाटत होते. एक दिवस त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्याबद्दल त्यांना विचारले. ते म्हणाले- ‘माझ्या समस्यांचे कारण कोण आहे हे बघायला मी आरशात बघतो. साहजिक माझाच चेहरा आत दिसतो म्हणून मला माझे उत्तर मिळते.’ त्या इसमाने विचारले, ‘मग दुसऱ्या वेळी परत का बघता?’ गुरू हसून म्हणाले, ‘माझ्या समस्यांचे समाधान कुणाकडे आहे ते जाणण्यासाठी.’
ही छोटीशी घटना अत्यंत बोधदायक आहे. येथे सत्य आहे- आपणच आमच्या समस्यांना जबाबदार आहोत व समाधानदेखील आपल्याकडेच आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत हेच सांगतात. तसेच प. पू. वामनराव पै म्हणतात- ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’
अध्यात्मशास्त्राप्रमाणे- आपण विचार करू तसे आपण आपले भवितव्य बनवू शकतो. त्यासाठी आवश्यक शक्ती भगवंताकडून मिळवण्यासाठी अगदी शास्त्रशुद्ध ध्यान ब्रह्ममुहुर्तावर करणे आवश्यक आहे. अनेकांना तसा स्वानुभव आहे.