भाजपच्या पहिल्या 100 उमेदवारांची नावे लवकरच

0
14

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आपल्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. येत्या गुरूवारी म्हणजे 29 फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लगेचच म्हणजे 29 रोजी किंवा दुसऱ्या दिवशी 1 मार्च रोजी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीतील देशातील 100 जणांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असणाऱ्या नेत्यांना उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान मिळवण्याची शक्यता आहे. मात्र ज्या जागी विद्यमान खासदारांना डच्चू देत नवीन उमेदवाराला संधी द्यायची आहे, अशा ठिकाणी भाजपकडून सर्वांत शेवटी उमदेवारी जाहीर केली जाईल, अशी भाजपची याबाबत रणनीती आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग, लालपुरा सुधा यादव, बी. एल. संतोष, ओम माथूर. बी. एस येडियुरप्पा सर्बानंद सोनोवाल, वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे.