>> गोव्यात 2026-27 पासून नियमाची अंमलबजावणी
येत्या म्हणजेच 2024-25 या शेक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याने 6 वर्षे पूर्ण केले पाहिजे अशी सूचना केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार तसे व्हायला हवे असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र गोव्यात 2026-27 पासून त्याची अंमलबजावणी होणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून ते शक्य नसल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले आहे. सध्या गोव्यातील शाळांमध्ये नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासंदर्भात चर्चा, विनिमय सुरू
आहेत.
2022 साली आम्ही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश देताना अडीच वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे वय येऊ घातलेल्या शैक्षणिक वर्षाच्या सुुरुवातीला सहा वर्षे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाईल. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाऐवजी त्या पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली इयत्तेसाठी सहा वर्षांच्या मुलांना प्रवेश देऊ असे केंद्राला कळवले असल्याचे श्री. झिंगडे यांनी सांगितले.
गोवा दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी भविष्यात गोवा शैक्षणिक व पर्यटन हब म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच यावेळी गोवा सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये संस्कृत शिकवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली होती.