‘किरू’ प्रकल्प प्रकरणात दिल्लीत 30 ठिकाणी छापेमारी
मलिक यांनीच उघडकीस आणले होते भ्रष्टाचाराचे प्रकरण
जम्मू-काश्मीरचे माजी नायब राज्यपाल, गोव्याचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने काल छापेमारी केली. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. ही कारवाई 2200 कोटी रुपयांच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना दावा केला होता की, एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फाईल्स निकाली काढण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. ज्यांनी भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले, त्यांच्यावरच सीबीआयने छापेमारी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, छाप्याला घाबरणार नाही, असे छापेमारीनंतर मलिक यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
किरू प्रकल्पाशी निगडित कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत मागच्या महिन्यात सीबीआयकडून जम्मू आणि काश्मीरमधील आठ ठिकाणांवर शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर काल 30 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
सत्यपाल मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या काळात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल होते. या काळात किरू प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटींची लाच देण्याचे आमिष दाखविले होते, असा गौप्यस्फोट खुद्द सत्यपाल मलिक यांनीच केला होता.
सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर गैरव्यवहाराप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. 2,200 कोटींच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले होते, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली होती.
मलिक यांनी 17 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना कोट्यवधींची लाच देऊ करण्यात आली होती. त्यादरम्यान दोन फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यापैकी एक मोठा उद्योगपती आणि भाजप आघाडी सरकारमधील एक मंत्री होता. त्यात घोटाळा झाल्याचे त्यांच्या सचिवांनी सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही करार रद्द केल्याचे मलिक यांनी सांगितले होते.