चंदीगडच्या महापौरपदी अखेर ‘आप’चा नगरसेवक

0
10

>> विशेषाधिकार वापरत सर्वोच्च न्यायालयाने निकाल फिरवला

>> भाजपच्या विजयासाठीचा खटाटोप अधिकाऱ्याच्या अंगलट

चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारावर सुनावणी करताना काल सर्वोच्च न्यायालयाने विशेषाधिकार वापरत मोठा निर्णय दिला. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला. जी आठ मते निवडणूक अधिकाऱ्याने जाणूनबुजून खाडाखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मते सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित केले. तसेच भाजपचा उमेदवार महापौर निवडणुकीत विजयी व्हावा, यासाठी मतपत्रिकांत फेरफार करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे आम आदमी पक्षाचे नगरसेवक कुलदीप कुमार हे चंडीगडचे नवे महापौर बनले आहेत.

चंदीगड महापौर निवडणुकीत एक खासदार आणि 35 नगरसेवकांसह 36 मते पडली. भाजपच्या बाजूने 16, तर 20 मते आप आणि काँग्रेस नगरसेवकांची होती. मतमोजणीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवाराला 16 मते मिळाल्याचे जाहीर केले. तसेच आप-काँग्रेसच्या उमेदवाराला 12 मते मिळाली आणि त्यांची 8 मते अवैध ठरल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात अनिल मसीह यांनीच ही मते छेडछाड करून बाद केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी केलेल्या गैरप्रकारामुळे भाजपचा उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाला होता.

चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारावर काल सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीवेळी मतपत्रिका आणि मतमोजणीचा संपूर्ण व्हिडिओ सादर करण्याचे आदेश दिले होते. मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण चित्रफीत आणि मतपत्रिकांचे मंगळवारी अवलोकन करण्यात आले. यावेळी अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ही मतमोजणी पुन्हा झाल्यानंतर आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर पहिल्याच सुनावणीवेळी ही लोकशाहीची थट्टा आहे, ही लोकशाहीची हत्या आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते, तर 19 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीवेळी या निवडणुकीतील घोडेबाजार गंभीर आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले होते.

अनील मसीहविरुद्ध गुन्हा दाखल होणार

पीठासीन अधिकारी अनील मसीह यांचे वर्तन दोन पातळ्यांवर घसरले आहे. प्रथमतः त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांनी महापौर निवडणुकीत गैरमार्ग अंगीकारला. दुसरे म्हणजे, या न्यायालयासमोर खोटे निवेदन दिले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आता अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.