पोरस्कडे-पेडण्यातील अपघातात एक ठार

0
11

>> महामार्गावर कार व दुचाकी यांच्यात धडक

>> दोन दिवसांत दोन अपघात, नागरिक संतप्त

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून काल रविवारी 18 रोजी पोरस्कडे न्हायबाग जंक्शनवर मोटरसायकल आणि चारचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीचालक अजित वसंत च्यारी (57) यांचा मृत्यू झाला. पोरस्कडे न्हईबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली.
अजित च्यारी हे मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते. काल रविवारी सुट्टी असल्यामुळे वास्को येथून पोरस्कडे येथे आपल्या मूळ गावी स्प्लेंडर दुचाकीने (जीए 03 एफ 5815) येत होते. त्यावेळी पोरस्कडे येथे त्याचबाजूने जाणाऱ्या कारने (एमएच 47 9726) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अजित हे गाडीवरून उसळून रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला आणि नाकातोंडाला गंभीर जखम झाली. ते 15 मिनिटे तसेच रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना नागरिकांनी तुये इस्पितळात नेले, मात्र तिथे उपचार करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोरस्कडे न्हयबाग जंक्शनवर उड्डाणपूल उभारावा किंवा या ठिकाणी जंक्शन रद्द करून पर्यायी मार्ग तयार करावा अशी अनेक वेळा ग्रामस्थांनी मागणी केली.

दुसऱ्याच दिवशी पुन्हा अपघात
शनिवारी हरमल येथे दोन चुलत भावांचा दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोरस्कडे न्हईबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. तत्पूर्वी मागच्या दोन-तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी भला मोठा कंटेनर कोसळूनही एक अपघात झाला होता. तर त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अपघाताच एकाचा मृत्यू झाला होता. ही अपघातांची मालिका रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांनी सरकारला निवेदने सादर केली. राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बगल मार्ग उभारावेत अशी मागणी मागच्या तीन वर्षापासून येथील नागरिक करत आहेत. परंतु सरकारने अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भाजप असंवेदनशील ः पाटकर

गोव्यातील रस्त्यांवर गेल्या 48 तासात 5 जणांचा जीव गेला पण त्याबाबत भाजप सरकार असंवेदनशील असून भाजप, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून याबाबत एका शब्दाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. सर्वजण केवळ नरेंद्र मोदींचा उदो- उदो करण्यात व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

गोमंतकीय जनतेचे दुःख आणि वेदनांची अजिबात कदर नसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि असंवेदनशील वृत्तीची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. भाजपने गोमंतकीयांना गृहीत धरले असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.
अपघात सत्र बंद व्हायला अजून किती जीव जायला हवेत असा सवाल करत श्री. पाटकर यांनी, मी सावर्डे येथिल दोन जवळच्या मित्रांच्या अंत्यसंस्काराला हजर होतो. हरमल येथे अपघातात बळी गेलेल्या दोन भावांच्या घरी आज भेट दिली. तिथले वेदनादायक व हृदयद्रावक वातावरण काळीज पिळवटून टाकणारे होते असे सांगून गोव्याला भाजपच्या शापातून मुक्त करा असे आवाहन यावेळी पाटकर यांनी केले.