साडेपाच कोटी रुपयांची देवमाशाची उलटी जप्त

0
9

>> मडगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई; केरळच्या दोघा तरुणांना अटक

मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा पोलीस व कोकण रेल्वे पोलिसांनी दोघा इसमांकडून देवमाशाची उलटी (व्हेल ॲम्बरग्रीस) जप्त केली. सदर देवमाशाच्या उलटीची किंमत 5.61 कोटी रुपये एवढी आहे. या तस्करी प्रकरणी केरळच्या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली; मात्र जप्त केलेला पदार्थ कोणता हे काल स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या एकंदर कारवाईची माहिती दिली. गोव्यात देवमाशाची उलटी पकडण्याचे हे गेल्या काही वर्षांतील पहिलेच प्रकरण आहे.

सविस्तर माहितुीनसार, गुरुवारी (दि. 15) सायंकाळी 6.30 च्या दरम्यान 25 ते 30 वयोगटातील दोन तरुण मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. मडगावहून केरळ जाण्यासाठी ते रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी पोलिसांना या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. संशयावरून पोलिसांनी त्यांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, तेल आणि मेणसदृश्य स्फटिक उग्र सुगंधी पदार्थ बॅगेत सापडला. मात्र हा पदार्थ नेमका कोणता याची खातरजमा होत नव्हती. त्याचवेळी सदर पदार्थाला उग्र सुगंध येत असल्याने त्या पदार्थाविषयी अधिक संशय बळावला होता.

यानंतर पोलिसांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सदर पदार्थाच्या तपासणीसाठी पाचारण केले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता सदर पदार्थ हा देवमाशाची उलटी (व्हेल ॲम्बरग्रीस) असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अरुण राजन (30) आणि निबीन वर्गीस (29) केरळ या दोघांना अटक केली. वनसंरक्षण कायद्याखाली कारवाई करण्यात आली.

दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी
अटक केल्यानंतर काल सदर दोघा तरुणांना न्यायालयात सादर केले असता त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रेल्वे पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे, उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील गुडलर, तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक विनोद मिश्रा यांनी ही कारवाई केली.

एका किलोची किंमत 1 कोटी
देवमाशाच्या उलटीची एका किलोची किंमत 1 कोटी रुपये आहे. पोलिसांनी 5.694 किलो उलटी जप्त केली होती. त्याची किंमत 5 कोटी 60 लाख 24 हजार रुपये एवढी आहे. त्यापासून औषधे बनविली जातात. तसेच सुगंधी अत्तर बनविले जाते.

देवमाशाची उलटी म्हणजे नेमके काय?
देवमाशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला ॲम्बरग्रीस असे म्हणतात. देवमाशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत आहे. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो. आता या गोळ्याला इतकी किंमत का असा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर म्हणजे सुगंध. या दगडासारख्या गोळ्याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो.