आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातील उमेदवार म्हणून बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी कायम ठेवून ‘इंडिया’चे उमेदवार उभे करण्याबाबत नवी दिल्ली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाची भूमिका जाहीर केली जाणार आहे, असे आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी काल सांगितले. काँग्रेस आणि आपची राष्ट्रीय स्तरावर आघाडी आहे आणि दोन्ही पक्ष राज्यासाठी जे चांगले होईल ते करतील. राज्यात भाजपचा पराभव करण्यासाठी आप योग्य निर्णय घेईल, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला. आपने लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघासाठी व्हेन्झी व्हिएगस यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी तातडीने नवी दिल्ली येथे धाव घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी गोव्यातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली होती.