राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीच्या चिंधड्या चिंधड्या उडत असताना गोव्यामध्येही आम आदमी पक्षाने काँग्रेसला जवळजवळ निकालात काढल्यागत दक्षिण गोव्यासाठी उमेदवार नुकताच परस्पर जाहीर करून टाकला. बरे, हा केवळ आपल्या पक्षाचा दक्षिण गोव्याचा उमेदवार असेही ‘आप’ने म्हटले नाही, तर वेन्झी व्हिएगश हा ‘इंडिया’ आघाडीचा दक्षिण गोव्याचा उमेदवार आहे असेही पक्षाने जाहीर करून टाकले आहे. ‘आप’चे गोव्यातील स्थान काय, त्याचे राजकीय, संघटनात्मक बळ काय, ह्या कशाकशाचा विचार न करता आणि दक्षिण गोव्यात काँग्रेसचा विद्यमान खासदार असताना त्या पक्षाला न जुमानता आम आदमी पक्षाने ही जी काही दांडगाई केली आहे, ती ‘इंडिया’ आघाडीची गोव्यातही शकले उडवून देणारी आहे. आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश हे एक कार्यक्षम आमदार म्हणून पुढे येत आहेत, विधानसभा अधिवेशनांमध्ये कार्यक्षम नेता म्हणून ते कामगिरी बजावत आहेत ह्याविषयी वादच नाही. दक्षिण गोव्याचे उमेदवार म्हणून खरोखरच ‘इंडिया’ आघाडीने त्यांचे नाव पुढे केले, तर भाजपला ते गांभीर्याने घ्यावे लागेल हेही तितकेच खरे, परंतु ज्या पक्षाचा खासदार दक्षिणेत विद्यमान आहे, ज्या पक्षाने राज्यामध्ये अनेक वर्षे सत्ता चालवली, ज्या पक्षामध्ये गेल्या काही वर्षांत मोठमोठी पक्षांतरे घडली तरीही जो पक्ष अजून आपले अस्तित्व ख्रिस्ती मतदारांमध्ये तरी टिकवून आहे, त्याला असे सरळसरळ निकाली काढून आम आदमी स्वतःला पर्याय म्हणून पुढे आणू पाहत असेल, तर थोडा त्या पक्षाचा इतिहासही तपासावा लागेल. आम आदमी पक्षाने गेल्या काही निवडणुकांत गोव्यात प्रचंड पैसा ओतला. दिल्लीतील मद्यघोटाळ्यातून आलेला हा पैसा होता असा ठपका सक्तवसुली संचालनालयाने नंतर ठेवला हा भाग वेगळा, परंतु गोव्यात चंचुप्रवेश करण्यासाठी आम आदमी पक्षाने जिवाचे रान केले. काँग्रेस ढासळत चालल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आपने केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते प्रयत्न यशस्वी ठरले आणि पक्षाचे दोन आमदार विधानसभेवर निवडून आले. मात्र, तत्पूर्वीच्या लोकसभा निवडणुकांतील पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती. प्रत्येकवेळी ‘आप’ने हट्टाने दक्षिण गोव्याची जागा लढवली. 2014 मध्ये स्वाती केरकर आणि 2019 मध्ये एल्विस गोम्स यांना रिंगणात उतरवले गेले. मात्र, केरकरांना अकरा हजार आणि एल्विस यांना जंग जंग पछाडूनही वीस हजार ह्या पलीकडे आम आदमी पक्षाची मजल गेली नाही. ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये केवळ काँग्रेसची मते फोडण्याचे काम मात्र ‘आप’ने केले. सार्दिन यांना गेल्या निवडणुकीत जेमतेम 9755 मतांची आघाडी मिळाली त्याला कारण आम आदमी पक्षच होता. ह्यावेळी एकास एक उमेदवार देऊन भाजपला सत्ताभ्रष्ट करण्याच्या गर्जना करीत ‘इंडिया’ आघाडी राष्ट्रीय पातळीवर उभी झाली. पण बघता बघता ती ढासळून पडली. आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहेच. त्याप्रमाणे गोव्यातही ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहोत असे म्हणू शकले असते. परंतु येथे आपला उमेदवार हा ‘इंडिया’ चा उमेदवार असल्याचे सांगत काँग्रेसला जबरदस्तीने रिंगणाबाहेर ढकलण्याचा चतुर डाव आम आदमी पक्षाने टाकला आहे. काँग्रेसमधील सध्याच्या निर्नायकी स्थितीबाबत तर न बोललेले बरे. निवडणुकीची रणनीती आखण्याऐवजी राहुल गांधी न्याययात्रेत गुरफटलेले आहेत. इतर पक्षांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची वृत्ती नाही. धडाडीने निर्णय घेणारे पक्षात नेते नाहीत. अशा स्थितीत ‘इंडिया’पासून फारकत घेत चाललेल्यांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची जरूरीही कोणाला भासलेली दिसत नाही. काँग्रेसचे चर्चेचे गुऱ्हाळच संपत नसल्याने एकेक पक्ष साथ सोडून चालता झाला आहे. आम आदमी पक्षाने गोव्यात जे केले ते मात्र काँग्रेसला सरळसरळ निकाली काढणारे पाऊल आहे. गोव्यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या का, दक्षिण गोव्याची जागा आम आदमी पक्षाने आणि उत्तर गोव्याची जागा काँग्रेसने लढवावी असा समझोता झाला होता का, किमान त्यावर चर्चा तरी झाली होती का? काँग्रेसच्या आयत्या बिळावर ‘आप’ नागोबा होऊ पाहत आहे असेच चित्र ह्या घोषणेमुळे निर्माण झाले आहे. उत्तर गोव्याची जागा काँग्रेसने लढवावी आणि दक्षिण गोव्याची जागा आम्हाला सोडावी असे आम आदमी पक्षासारखा नवखा पक्ष काँग्रेसला ठणकावत आहे यावरून आज काँग्रेसची पत काय राहिली आहे हे कळून चुकते. दोन्ही पक्षांमधील चर्चेआधीच परस्पर केल्या गेलेल्या ह्या घोषणेबाबत काँग्रेस मुकाट मान डोलावणार की फारकत घेऊन स्वतंत्रपणे आपला उमेदवार जाहीर करणार? तसे झाल्यास ‘आप’ ‘इंडिया’ आघाडीचा मान राखणार काय?