आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना वर्तवली. या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच आपले निवडणूक प्रचाराचे काम हाती घेतले असून, काल बुधवारी उत्तर गोवा व त्याआधी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यालये सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय नेत्यांनी आम्हाला प्रचारसाठीचे पूर्वकाम 15 फेब्रुवारीपूर्वी हाती घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार काल दोन्ही कार्यालये सुरू केल्याचे ते म्हणाले. पक्षाने लोकसभेसाठीचे आपले उमेदवार जाहीर केलेले नसले तरी आम्ही पक्षाचे कमळ हे चित्र पुढे करुन प्रचाराला सुरवात केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा जो मोदींचा नारा आहे त्यानुसार लोकसभेबरोबरच सर्व विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत का, असे विचारले असता, यावेळी त्या घेणे शक्य होईल असे दिसत नसल्याचे तानावडे म्हणाले.