मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री (एक-दोन मंत्री सोडून) आणि प्रदेश भाजपचे पदाधिकारी हे गुरुवारी अयोध्येला जाणार असून, तेथील राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना दिली.
गोव्यातून यापूर्वीच ‘मुख्यमंत्री देवदर्शन योजने’खाली रेल्वेतून अयोध्येला गेलेले यात्रेकरू देखील याचवेळी मुख्यमंत्र्यांबरोबर राम मंदिरात जाऊन देवदर्शन घेणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. काही वैयक्तिक कारणामुळे आपण मात्र मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिगणांबरोबर अयोध्येला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येला जाऊन राममंदिरात देवदर्शन घेण्यासाठी पक्षाने ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या. गोव्याला 15 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे, असे तानावडे यांनी सांगितले.
16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असून, तेथे विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत. 17 व 18 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची बैठक दिल्लीला होणार असून, मुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार असल्याचे तानावडे म्हणाले.