आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यात आपणाला कोणताही रस नाही, असे भाजपचे आमदार रमेश तवडकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सक्षम असे कोण उमेदवार आहेत, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक पाहणी केली होती. त्यात सक्षम अशा संभाव्य उमेदवारांच्या यादीत आपलेही नाव होते; पण मला ही निवडणूक लढवण्यास रस नाही, असे आपण पक्षाला कळवल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.
भाजपने एक सक्षम उमेदवार या नात्याने तुम्हाला दक्षिण गोवा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते का, असे विचारले असता पक्षाने आपणाला तसे सांगितले नव्हते; पण त्यापूर्वीच आपण आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे तवडकर म्हणाले.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून गेल्या काही महिन्यांपासून मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते बाबू कवळेकर व दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर ही तीन नावे चर्चेत होती. दरम्यान, भाजपचे नेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही यापूर्वीच आपणाला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
आता दक्षिण गोव्यासाठीच्या भाजपच्या दोन दिग्गज संभाव्य नेत्यांनी ह्या निवडणुकीतून माघार घेतल्याने माजी खासदार नरेंद्र सावईकर व बाबू कवळेकर यांच्यातच ह्या उमेदवारीसाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे देखील ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.