पर्वरीतील मॉल द गोवासमोर तीन वाहनांत विचित्र अपघात

0
5

>> कार उलटली, जीवितहानी नाही

पर्वरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दर आठवड्याला एक दोन अपघात होत असल्याची पोलीस दफ्तरी नोंद झाल्याचे आढळून येते. काल रविवारी दि. 11 रोजी महामार्गावरील मॉल द गोवासमोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे नकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मॉल द गोवा येथे झालेला या आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.

निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता स्विफ्ट डिझायर पर्यटक कार (जीए 06 टी 8022) एका दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ब्रेक मारून थांबण्याच्या प्रयत्नात उलटण्याचा प्रकार
घडला.

हवालदार सुभाष गावस यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. सविस्तर माहितीप्रमाणे स्विफ्ट डिझायर कारला मागून येणाऱ्या स्कोडा कारने (जीए 07, के 8792) अचानक ओव्हरटेक केले. त्यामुळे डिझायर कारने ब्रेक लावला त्या प्रयत्नात कार उलटली. त्यावेळी पुढे जाणाऱ्या होंडा मोटारसायकलला (जीए 03 एडी 8110) निसटती धडक दिली. या विचित्र अपघातात डिझायर कार आणि मोटारसायकलचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.