>> दिल्लीमधूनही आपची इंडिया आघाडीतून माघार?
आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्लीतही इंडिया आघाडीची साथ सोडल्याचे वक्तव्य करतानाच येत्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. दिल्लीवासीय लोकसभेच्या सातही जागा ‘आप’ला देतील असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. केजरीवालांनी शनिवारीच चंदीगड आणि पंजाबमध्ये आप एकटा लढणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु दिल्लीबाबत काही घोषणा केली नव्हती. परंतु काल रविवारी त्यांनी दिल्लीकर सातही जागा आपलाच देतील, असे वक्तव्य केल्याने दिल्लीतही ते काँग्रेससोबत आघाडी करून लढणार नसल्याचे निश्चित झाले आहे. पंजाबच्या तरनतारनमध्ये एका सभेला केजरीवाल संबोधित करत होते. आज भाजपला फक्त आम आदमी पार्टीची भीती वाटते. यामुळे पंजाबमध्ये आम्हाला काम करण्यापासून रोखले जात आहे आणि दुसरीकडे दिल्लीत हे लोक आम्हाला थांबवत आहेत. मला जे काम करायचे आहे ते करू दिले जात नाहीय, असा आरोप केजरीवाल यांनी भाजपा आणि काँग्रेसवर केला. दहा वर्षांच्या आता छोट्याशा पक्षाने पंजाब, दिल्लीत सरकार बनविले. गुजरात, गोव्यात आमदार झाले असल्याचे केजरीवाल पुढे म्हणाले. यामुळे एक दिवस केंद्रात आप सत्ता स्थापन करेल अशी भीती भाजपला वाटू लागली असल्याचे केजरीवाल म्हणाले.
..अन्यथा देशभर एकटे लढू ः खर्गे
आपच्या स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कोणी सोबत आले तर ठीक, नाही तरीही हरकत नाही. एकट्यानेच निवडणूक लढवू असे वक्तव्य लुधियानातील समरालामध्ये केले आहे. काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच एकजूट होण्याची शक्यता मावळत चालली आहे. चार महिन्यांपूर्वी एकजूट दाखविणारे विरोधी पक्ष बाहेर पडू लागले आहेत. ही आघाडी करू पाहणारे नितीशकुमार भाजपासोबत गेले आहेत. केजरीवाल यांनी पंजाब, चंदीगडसह दिल्लीतही एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. प. बंगालमधून तृणमूल काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे सांगितले. यामुळे आता काँग्रेसनेही एकट्याच्या जिवावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
कोणी आले तरी ठीक आहे, कोणी नाही आले तरी ठीक आहे. संपूर्ण देशात आम्ही हा निर्णय घेतला आहे. असे खर्गे यांनी सांगितले.