मोदींची गॅरंटी

0
23

भारतीय जनता पक्ष जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करतो, तेव्हा ते किती बारकाईने केलेले असते, किती गोष्टींचा सूक्ष्मपणे केलेला विचार त्यामागे असतो, हे समजून घ्यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या मडगावच्या सभेतील त्यांच्या भाषणाकडे बारकाईने पहावे. पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असावा, त्यांच्या भाषणाची मध्यवर्ती संकल्पना काय असावी, त्यामध्ये कोणते विषय नसावेत, कोणत्या गोष्टींवर भर द्यावा, स्थानिक जनतेशी जवळीक साधण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख करावा ह्या सगळ्याच्या आकलनासाठी पंतप्रधानांचे कालचे भाषण अभ्यासण्यासारखे आहे. आपल्या भाषणाची सुरूवात त्यांनी नेहमीप्रमाणे कोकणीतून केली आणि सुरुवातीलाच स्थानिक जनतेच्या काळजाला हात घातला. मग त्यांनी सोहिरोबानाथांची आठवण काढली, कृष्णंभट्ट बांदकरांना स्मरले, केसरबाई केरकर, धर्मानंद कोसंबी, रघुनाथ माशेलकरांपर्यंत सर्वांची आठवण काढली आणि काल पुण्यतिथी असलेल्या लता मंगेशकरांचेही त्यांनी अत्यंत औचित्यपूर्ण स्मरण केले. ही सभा मडगावात असल्याने स्वामी विवेकानंद मडगावात दामोदर सालात येऊन गेले होते तो ऐतिहासिक दाखलाही त्यांनी दिला आणि गोवा मुक्तिलढ्याचे स्फुल्लिंग जिथे प्रज्वलित झाले त्या लोहिया मैदानाचा आणि कुंकळ्ळीच्या हुतात्मा स्मारकाचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यंदा होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शवदर्शन सोहळ्याचाही त्यांनी आवर्जून आणि जाणीवपूर्वक उल्लेख केला. ख्रिस्तीधर्मीय आणि इतर धर्मीयही गोव्यात कसे मिळून मिसळून राहत आहेत आणि येथील वैविध्य, सलोखा, एकजूट ह्या गोष्टी संपूर्ण देशाला कसा संदेश देत आहेत, ‘सबका साथ, सबका विकास’ ह्या आपल्या सरकारच्या भूमिकेला कसे बळ देत आहेत, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. हिंदुत्व, अयोध्या, सनातनधर्म वगैरे वगैरे उत्तर भारतातील कोणत्याही सभेत प्राधान्य मिळणाऱ्या विषयांना येथे त्यांनी चुकूनही स्पर्श केला नाही. भाजपच्या केंद्रातील आणि गोव्यातील सरकारने केलेली विकासकामे, राबवलेल्या कल्याणयोजना ह्यावरच त्यांचे हे संपूर्ण भाषण केंद्रित होते. अनेक योजनांचे शंभर टक्के उद्दिष्ट गोव्यात गाठले गेलेले असल्याने हे सॅच्युरेशन हाच खरा सेक्युलरिझम असल्याचेही पंतप्रधान उद्गारले. तोच खरा सामाजिक न्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुळात ह्या सभेची संकल्पनाच ‘विकसित भारत विकसित गोवा 2047′ अशी होती. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोव्यात भाजपच्या प्रचाराचा हाच केंद्रबिंदू राहणार आहे. काही काळापूर्वी राज्यात निघालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ने त्याची नांदी केलेलीच आहे. त्यामुळे साधनसुविधा विकास, कल्याणयोजना, विविध घटकांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात घोषित केलेले नवे संकल्प ह्या सगळ्यांसाठी ‘मोदी गॅरंटी’ हेच ह्या सभेचे सार होते आणि भाजपच्या आगामी प्रचार मोहिमेचीही तीच दिशा राहील. चार कोटी लोकांना आपल्या सरकारने कशी पक्की घरे दिली आणि त्यात आणखी दोन कोटी घरांची भर घालून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे कशी दिली जाणार आहेत, मच्छीमारांसाठी मत्स्योद्योग विकासाच्या आणि सागरी संपदेच्या निर्यातीला विविध योजनांद्वारे कशी चालना दिली जाणार आहे, त्यातून नवे रोजगार कसे निर्माण होणार आहेत, गोव्याच्या पर्यटनात निसर्ग, संस्कृती आणि वारसा यांना कसे प्राधान्य दिले जाणार आहे, यापुढे पर्यावरण पर्यटन आणि परिषद पर्यटनासारखी नवी दिशा कशी दिली जाणार आहे अशा अगदी नेमक्या मुद्द्यांचा समावेश पंतप्रधानांच्या भाषणात होता, असे आपल्याला दिसेल. भाषणाला उभे राहिले आणि उगाच कुठल्या कुठे वाहत गेले असे मोदींच्या भाषणाचे कधीही होत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक विषय अगदी मोजूनमापून, विचारपूर्वक त्या भाषणात आखलेला असतो. कालच्या त्यांच्या गोव्यातील भाषणातूनही हेच प्रत्ययास आले. गोव्यात डबल इंजिन सरकारने केलेल्या विकासकामांचे दाखले त्यांनी दिले, नव्या रोजगारांच्या संभावना सांगितल्या, आपल्या पक्षाच्या सरकारांनी राज्याला सुशासन कसे दिले आहे ते सांगितले, राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा मोहीम कशी अभूतपूर्वरीत्या राबवत आहे त्यावर ते बोलले आणि शंभर टक्के हर घर नलसे जल, शंभर टक्के वीज, शंभर टक्के एलपीजी, शंभर टक्के खुल्या जागेतील शौचापासून मुक्ती, केंद्रीय योजनांचा शंभर टक्के लाभ ह्या सगळ्यातून गोवा हे देशातील सर्वांत आनंदी राज्य कसे बनले आहे ह्याचे एक आदर्शवादी चित्रही त्यांनी आपल्या भाषणातून उभे केले. जोडीला पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने कुंकळ्ळीत एनआयटी प्रकल्पाचे उद्घाटन, दोनापावलाच्या देशातील पहिल्यावहिल्या जलक्रीडा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन, काकोड्याच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन, पणजी रेईश मागूश रोपवेचा व शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शीलान्यास, बेतूल येथे भरलेल्या ओएनजीसीच्या सी सर्व्हायव्हल परिषदेचे उद्घाटन, ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन असा त्यांचा भरगच्च कार्यक्रमही होता. जाहीर सभेसाठी उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्याची निवड ह्यावेळी करणेही बोलके होते. आपले सरकार हे केवळ बोलणारे, आश्वासने देणारे सरकार नाही, तर अविरत काम करणारे, दिलेली आश्वासने पूर्ण करणारे सरकार आहे आणि ते सर्वसमावेशक आहे, असा ठसा गोव्याच्या विशेषतः दक्षिण गोव्यातील मतदारांवर उमटविण्याचा प्रयत्न अत्यंत काळजीपूर्वक आखल्या गेलेल्या ह्या साऱ्या भरगच्च दौऱ्यातून झाला असे आपल्याला दिसेल. जाहीर सभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची मध्यवर्ती संकल्पना देखील पंतप्रधानांच्या भाषणाशी अगदी सुसंगत व केंद्रातील मोदी सरकारने आखून दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी आपले सरकार कशी करीत आहे हेच सांगण्यावर त्यांचा भर होता. क्लीन इंडिया, स्कील्ड इंडिया, फिट इंडिया, इन्क्लुजिव्ह इंडिया ह्या सगळ्या दिशादर्शक सूत्रांच्या वाटेवरूनच आपले सरकार चालत आहे हे सांगण्याची संधी त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली. भाजपला राज्याराज्यांतून जे देदीप्यमान यश मिळत आले आहे, ते काही सहजासहजी हवेतून मिळत नसते. त्यासाठी असे काटेकोर, बारकाईचे आणि अत्यंत शिस्तबद्ध नियोजन असते, आखणी असते हेच पंतप्रधानांच्या ह्या अवघ्या एका दिवसाच्या परंतु भरगच्च दौऱ्यातून त्यांनी आणि पक्षाने जे काही साध्य केले त्यातून दिसून येते, नाही काय?