अमेरिका, रशियासह प्रगत देशांची भारत ऊर्जा सप्ताहात दालने

0
12

>> केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती

भारत ऊर्जा सप्ताह 24 मध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा या प्रगत देशांची पॅव्हेलियन असून विविध देशांतील 13 ऊर्जा मंत्री, 900 हून अधिक प्रदर्शकांची उपस्थिती अपेक्षित आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषदेत बेतुल येथे बोलताना सांगितले.

रशियाची दोन पॅव्हेलियनचा समावेश आहे. मेक इन इंडियाचे 300 हून अधिक प्रदर्शकांसह एक विशेष पॅव्हेलियन सज्ज आहे. भारतीय लघू उद्योगाचे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नावीन्यपूर्ण उपायांचे प्रदर्शन केले जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले.
या भारत ऊर्जा सप्ताह 2024 साठी (आयईडब्लू) प्रदर्शकांची संख्या 900 पेक्षा जास्त अपेक्षित आहे. प्रदर्शन क्षेत्रामध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. परिणामी प्रदर्शनाच्या महसुलात 46 टक्के वाढ झाली आहे. खाजगी कंपन्यांच्या एकूण महसुलात 81 टक्के वाढ झाली असून खाजगी प्रायोजकांच्या संख्येत 44 टक्के वाढ झाली आहे.

भारत ऊर्जा सप्ताहाला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे सप्ताहाचा कालावधी आणि धोरणात्मक सत्रांची संख्या 3 ते 4 दिवसांपर्यंत वाढली आहे. 46 धोरणात्मक सत्रे आणि 46 तांत्रिक सत्रे असतील. आयईडब्लू 24 साठी 2000 तांत्रिक प्रबंध आले आहेत. देशांतर्गत प्राधान्य क्रमानुसार शिपिंग, लॉजिस्टिक आणि वितरण व्यवस्था, निर्मिती आणि औद्योगीकरण, भविष्यातील गतिशीलता आणि खाण आणि खनिजे यांसह 4 नवीन तांत्रिक श्रेणी जोडल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीतच भारत ऊर्जा सप्ताह जागतिक ऊर्जा उपक्रमांमधील एक प्रमुख उपक्रम बनला आहे. सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था, वाढता ग्राहक आधार आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण यामुळे आम्ही जागतिक ऊर्जा क्षेत्रामध्ये एक ठळक स्थान निर्माण केले आहे, असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले.

भारत जीवाश्म इंधनापासून जैव इंधनाकडे जाण्याच्या सिद्धतेत आहे. सर्व राष्ट्रांना जागतिक बायोगॅस युतीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले.