बदलाचे वारे

0
175

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांपैकी तब्बल ११६ जणांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात मते टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यातही दोन मते अवैध, तर पाच मते कोविंद यांच्या पारड्यात पडली. गोव्यातील भाजप सरकार पाडण्याच्या वल्गना करणार्‍या कॉंग्रेस नेत्यांना जमिनीवर आणणारी ही बाब आहे. राज्याराज्यांतून अशाच प्रकारे झालेले ‘क्रॉस वोटिंग’ हे अनेक विरोधकांच्या उगवत्या सूर्याला दंडवत ठोकण्याच्या वृत्तीचेच दर्शन घडवते आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण पाहा. तेथे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेरा आमदारांनी कोविंद यांच्या बाजूने मतदान केल्याचे दिसते. सत्तेत राहून भाजपाच्या पायांत पाय अडकवत आलेल्या शिवसेनेलाही त्यामुळे बदलत्या परिस्थितीचे भान ठेवावे लागेल. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या आठ जणांनी कोविंद यांच्या बाजूने मतदान केले. तेथे शंकरसिंह वाघेला यांनी काल आपल्या वाढदिनी कॉंग्रेसला खिंडार पाडले आहे. गुजरातमध्ये या वर्ष अखेरीस निवडणूक होणार आहे. तेेथे कॉंग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करावे असे वाघेला यांचे म्हणणे होते, परंतु प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी व इतरांची नाराजी टाळण्यासाठी कॉंग्रेसने ते केले नाही, त्यामुळे वाघेला यांनी पक्षाला दणका देत तिसर्‍या आघाडीचा घाट घातला आहे. भाजपाचे कट्टर विरोधक असलेल्या तृणमूल कॉंग्रेस आणि माकपपैकी काहींनी पश्‍चिम बंगालमध्ये कोविंद यांना मतदान केले आहे. भाजप आघाडीच्या सहा मतांऐवजी तेथे कोविंद यांना अकरा मते मिळाली आहेत. इतकेच कशाला, दिल्लीमध्ये आपच्या दोघा आमदारांनीही कोविंद यांना मतदान केले आहे. आसाममध्ये मीराकुमार यांना ३९ ऐवजी ३५, उत्तर प्रदेशमध्ये ७३ ऐवजी ६५ मतेच मिळाली. मतदारांनी आपल्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ ऐकून मतदान करावे असे आवाहन मीराकुमार यांनी केले होते. कॉंग्रेसजनांचा ‘अंतरात्म्याचा आवाज’ त्यांना वेगळेच काही सांगतो आहे असे आता या निकालावरून दिसते आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार किंवा समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी निवडणुकीपूर्वीच आपला चेहरा भाजपाच्या उमेदवाराच्या दिशेने वळवलेला होता. पण अनेकांनी जाहीरपणे आपली पसंती व्यक्त न करता प्रत्यक्षात कोविंद यांना म्हणजे भाजपाच्या बाजूने मतदान करून आपल्या भावी आकांक्षा स्पष्ट केल्या आहेत. बिहार, हरयाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ही काही राज्ये अशीही आहेत जेथे ‘क्रॉस वोटिंग’ झालेले नाही. परंतु इतरत्र झालेले क्रॉस वोटिंग आणि छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांनी भाजपाची या निवडणुकीत दिलेली साथ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समीकरणे बदलणार आहेत याचे स्पष्ट संकेत देत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा भाजपाला चार हात दूर ठेवले जायचे. त्याच्याशी संगत नको रे बाप्पा अशीच भूमिका इतर पक्ष घ्यायचे. परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते आहे. जो तो भाजपाची साथ घ्यायला उत्सुक दिसतो. आंध्र व तेलंगणामध्ये तेलगू देसमपासून तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर कॉंग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपा उमेदवाराला पाठिंबा देऊन जवळीक साधली आहे. तामीळनाडूत अभाअद्रमुकने कोविंद यांना मतदान केले आहे. ही सगळी बदललेल्या समीकरणांची नांदी आहे. भाजपाला देशात वाढती स्वीकारार्हता मिळू लागल्याची आणि काही राज्यांतील राजकीय विजनवास संपल्याची ती निदर्शक आहे. यातून आपल्या पक्षाचा विस्तार सध्याच्या कार्यक्षेत्रापलीकडील भौगोलिक भागांमध्ये करण्याची संधी भाजपा नेतृत्वापुढे चालून आलेली आहे, तर कॉंग्रेससाठी पुन्हा एकवार आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे. हवेत वावरणार्‍या पक्षनेतृत्वाने जमिनीवर येऊन आपल्या चुका तपासण्याची पुनश्च वेळ आलेली आहे.