थोर समाजसेवक रामकृष्ण नायक यांचे देहावसान

0
5

धी गोवा हिंदू असोसिएशनचे अध्वर्यू

मुंबई तसेच गोव्यातील नाट्य चळवळ व रंगभूमी तसेच सामाजिक कार्यांतील भीष्माचार्य अशी ओळख असलेले थोर गोमंतकीय सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण केशव नायक (96) यांचे काल रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मडगाव येथील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाचे प्रभाकर वेर्णेकर यांनी मंत्राग्नी दिला.
धी गोवा हिंदू असोसिएशन, गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाज सेवा संघ, स्नेह मंदिर अशा अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. वयोमानामुळे सक्रिय समाजकार्यातून निवृत्ती घेतलेल्या रामकृष्ण नायक यांनी सध्या बांदोडा फोंडा येथील स्नेहमंदिरात आश्रय घेतला होता. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना फोंडा येथील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार चालू असतानाच रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते अविवाहित होते.
मडगाव येथून उपजीविकेसाठी मुंबईला गेलेले रामकृष्ण नायक हे पन्नाशीच्या दशकात ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ या समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या धर्मादाय संस्थेत दाखल झाले. मुंबईत राहणाऱ्या गोमंतकीयांनी स्थापन केलेल्या या संस्थेने जेव्हा कला विभाग सुरू केला तेव्हा रामकृष्ण नायक यांनी या कला विभागाची यशस्वीपणे धुरा वाहिली.
दि. 3 नोव्हेंबर 1928 रोजी रामकृष्ण नायक यांचा जन्म झाला. गोव्यातील समाजकार्यातील अध्वर्यू म्हणून ओळखले जाणारे केशव नायक यांचे ते पुत्र होत. आपल्या वडिलांकडून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला.

रामकृष्ण नायक यांच्याकडे उत्तम नाटक हेरण्याची जाण व कलावंतांची अचूक पारख करण्याची वृत्ती होती. त्याद्वारेच त्यांनी संस्थेच्या कला विभागाचे प्रमुख असताना कानेटकरांची ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’ अशी नाटके संस्थेतर्फे सादर करून मराठी व्यावसायिक रंगभूमीचा चेहरा मोहराच बदलून टाकला. कानेटकर यांच्याबरोबरच त्यांनी वि. वा. शिरवाडकर, जयवंत दळवी आदींचीही एकापेक्षा एक अशी सरस नाटके संस्थेतर्फे केली. त्यात ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटकांचा समावेश होता. पुढे नाट्यव्यवसायाला धंदेवाईकपणाचे वळण लागल्यानंतर नायक यांनी व्यावसायिक निर्मिती थांबवून समांतर रंगभूमीवरील तरुणांना हाताशी धरून ‘नागमंडळ’, ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ अशी प्रायोगिक बाजाची नाटके सादर केली.

गोव्यात स्नेहमंदिर उभारले
80 च्या दशकात नायक यांनी गोव्यात बांदिवडे येथे संस्थेच्यावतीने ‘स्नेहमंदिर’ नावाचा वृद्धाश्रम उभा केला. या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन ते अत्यंत आत्मीयतेने करत होते. अशा या पडद्यामागील कलाकाराचा शासनाने प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

युरी आलेमांवकडून दु:ख
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रामकृष्ण नायक यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. गोवा हिंदू असोसिएशन, स्नेह मंदिर अशा संस्थांबरोबरच त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हे फार मोठे असल्याचे आलेमाव यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

स्नेहमंदिर ही संजीवन
समाधी ठरू शकेल

समाजसेवा आणि सांस्कृतिक चळवळीसाठी ज्यांनी आपले आयुष्य अर्पण केले असा एक महान गोमंतकीय सुपुत्र हरपला. स्नेहमंदिर ही त्यांची संजीवन समाधी ठरू शकेल. गोवा हिंदू असोसिएशना माध्यमातून त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला एक नवी दिशा देण्याच्या कामात फार मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा कार्य करणाऱ्या नव्या पिढीला त्यांचे जीवन आणि कार्य सदैव प्रेरणा देत राहील. गोवा मराठी अकादमीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली.

प्रा. अनिल सामंत
अध्यक्ष
गोवा मराठी अकादमी

आदर्शवत सेवाभावी वृत्ती

गोवा हिंदू असोसिएशन मुंबई, स्नेह मंदिर बांदिवडे या संस्थांचे संस्थापक तसेच सामाजिक, सांस्कृतिक साहित्यिक जीवनात समरस झालेले थोर समाजसेवक रामकृष्ण नायक यांनी वयाच्या नव्वदीतही तरुणाईच्या उत्साहाने या संस्थेचे झोकून देऊन कार्य केले. संस्था म्हणजे त्यांचा श्वास आणि ध्यास होता. व्रतस्थपणे ते सामाजिक, सांस्कृतिक जीवनात वावरले. त्यांचा पिंडच मुळी समाजसेवकाचा होता. त्यांचे निष्कलंक चारित्र्य व सेवाभावी वृत्ती आदर्शवत अशीच होती. त्यांचाच स्नेह असलेले अनेक मान्यवर हे त्यांच्यामार्फत गोमंत विद्या निकेतनमध्ये सुरुवातीच्या काळात वक्ते म्हणून आले. गोवा मुक्ती चळवळीतही त्याचे योगदान होते. गोवा नॅशनल काँग्रेसचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

दर्जेदार नाटके

गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागातर्फे अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणण्यात रामकृष्ण नायक यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामध्ये खडाष्टक (1955), संशयकल्लोळ (1956), करीन ती पूर्व (1957), संगीत शारदा (1959), युद्धस्य कथा.. व मरणात खरोखर जग असते (1960), मृच्छकटिक (1961), रायगडला जेव्हा जाग येते (1962), मत्स्यगंधा (1964), लेकुरे उदंड झाली व आर्य चाणक्य (1966), धन्य ते गायनी कळा (1968), तुझा तू वाढवी राजा (1969), एकच प्याला, नटसम्राट, पद्मश्री धुंडीराज व आटपाटची राजकन्या (1970), मीरा मधुरा व बिराड वाजलं (1971), सभ्य गृहस्थ हो (1973), अखेरचा सवाल (1974), दिसतं तसं नसतं (1975), बॅरिस्टर (1977), सूर्याची पिल्ले (1978), अभिज्ञान शाकुंतल व मंतरलेली चैत्रवेल (1979), दुर्गी (1980), जिथे चंद्र उगवत नाही (1981), हयवदन (1983) शिवाय स्पर्श, नागमंडल, तू तर चाफेकळी, वसंतात अर्ध्या रात्री अशी अशा गाजलेल्या अनेकविध नाटकांचा समावेश होता.

ज्येष्ठ साहित्यिकांशी संबंध

रामकृष्ण नायक यांचा मुंबईतील ज्येष्ठ नाटककार, लेखक, चिंतक यांच्याशी जवळचा संबंध होता. कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी अशा अनेक दिग्गज नाटककारांशी त्यांचा एकदम जवळचा संबंध होता. त्यांची नाटके गोवा हिंदू असोसिएशनतर्फे रंगमंचावर आणली व त्यात गोमंतकीय नटांना वाव मिळवून दिला. नट, अभिनेत्री, गायक-गायिकांना त्यांनी पुढे आणले. ही संस्था म्हणजे त्यांचा वास. या संस्थेमार्फत गोव्यातील असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या. पेशाने चार्टर्ड अकाऊंट असलेले रामकृष्ण हे थोर समाजसेवक होते.
काल त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच इस्पितळात व मडगाव येथे त्यांच्या निवासस्थानी विविध थरांतील लोकांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. अंत्ययात्रेत असंख्य लोक उपस्थित होते.