॥ संस्कार-रामायण ॥

0
11

रामायणाचं अवतरण…

  • प्रा. रमेश सप्रे

दैवीशक्तीचा अवतार मानवाच्या उद्धारासाठी असतो. तसेच रामायणाचे अवतरण मानवजातीच्या उद्धरणासाठी आहे याचा अनुभव सर्वांना दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्रतेने येऊ लागलाय…

‘गंगावतरणा’चा प्रसंग अनेकांना माहीत आहे. दूरदर्शनच्या पडद्यावर रामायण, महाभारत व अन्य पौराणिक मालिकांतून सर्वांनी तो एकरूप होऊन पाहिलेला आहे.
असेच असते ग्रंथावतरण. विशेषतः महान ग्रंथाचे अवतरण होण्यास एखादी घटना किंवा प्रसंग घडावा लागतो. जगाचे कल्याण करणारे जे संतांचे किंवा संतांसंबंधी ओवीबद्ध ग्रंथ असतात, त्यांच्या अखेरच्या अध्यायात त्या ग्रंथाची अवतरणिका दिलेली असते, जिच्यात सर्व ग्रंथांचे अध्यायवार सार असतात. आरंभी असते ती अनुक्रमणिका, तर ग्रंथाच्या अखेरीस असते ती अवतरणिका. असो.
रामायणाच्या अवतरणाचा प्रसंग तसा अद्भुत आहे. वाल्मीकी ऋषी आपल्या शिष्यांसह तमसा नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले असतात. पहाटेचे अतिशय प्रसन्न वातावरण असते. वाल्मीकींची चालताबोलता समाधीच लागलेली असते. अशा चलसमाधीत बोलले तरी मौन भंगत नाही आणि चालले तरी आसन (योगासन) मोडत नाही. वाल्मीकींची आध्यात्मिक पातळी खूप वरची होती.
अशा प्रशांत वातावरणाचा वेध घेत एक बाण आला आणि समोरच्या वृक्षावर क्रीडा करण्यात मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील एकाला लागला. त्यात जो नर होता तो जखमी होऊन झाडावरून खाली पडला नि तडफडू लागला. क्रौंच पक्षिणीने काहीवेळ त्याच्या शरीरातून चोचीने बाण काढण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ! शेवटी नाईलाजाने ती असहाय क्रौंच मादी उडून गेली.
ते दृश्य पाहून वाल्मीकी ऋषींचे मन द्रवले. (अशाच प्रसंगाचे वर्णन करणारी ना. वा. टिळक यांची ‘केवढे हे क्रौर्य’ ही गाजलेली कविता. वाचताना (म्हणताना)- डोळ्यासमोर तो करुण प्रसंग उभा राहतो. आपल्या हृदयात कालवते.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख। केले वरी उदर पांडुर निष्कलंक।
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले। निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!॥)
संवेदनशील वाल्मीकी ऋषींना त्या क्रौंच पक्ष्याची वेदना सहन झाली नाही. पण त्या वेदनेचा वेद झाला. खरे तर वेदाहूनही मधुर मंजूळ अशी आदी कवीची वाणी प्रकटली. त्याचे असे झाले- वाल्मीकींनी उत्स्फूर्तपणे (नकळत) तो बाण मारून क्रौंचाला मारणाऱ्या निषादाला (शिकाऱ्याला) शाप दिला ः
मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम्‌‍ अवधीः काममोहितम्‌‍॥
म्हणजे- हे निषादा, तुला अनंत काळ प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. कारण क्रौंच पक्ष्यांची जोडी कामक्रीडा करत असताना त्यापैकी एकाचा तू वध केला आहेस. (‘अनंत काळपर्यंत’ म्हणताना तुलाच नव्हे तर तुझ्या वंशालाही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही- असाही अर्थ सूचित होतो.)
ती शापवाणी उच्चारली गेली मात्र… तिथे उपस्थित असलेल्या साऱ्या शिष्यांना महदाश्चर्य वाटले. एक म्हणजे, जितक्रोध (राग जिंकलेल्या) अशा आपल्या सद्गुरूंना राग कसा आला? दुसरे म्हणजे- त्या क्रौंच पक्ष्याने निषादाचे काय वाईट केले होते म्हणून आपल्या गुरूंनी त्याला शाप दिला, तर त्या निषादाने आपल्या गुरूचे काय वाईट केले होते?
या शापापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो शाप कर्कश वाणीतून दिला गेला नव्हता तर अतिशय मधुर पद्धतीने दिला गेला होता. त्यातून मानवाच्या इतिहासात प्रथमच काव्याचा जन्म झाला होता. तसे यापूर्वीचे वेद- उपनिषदादी वाङ्मय पद्यरचनेत होते त्याला काव्याची (कवितेची) शैली नव्हती. ती अनुष्टुप्‌‍ या चार चरण आणि बत्तीस अक्षरे या छंदातली रचना होती. स्वतः वाल्मीकींना याचे खूप अप्रूप वाटले. तो उत्स्फूर्तपणे उद्गारलेला पहिला श्लोक. पुढे याच छंदात रामचरित्राची (रामायणाची) रचना केली जाणार होती. ही नियतीची अटळ इच्छा होती.

आज काहीतरी आगळेवेगळे घडणार असे वाटत असताना ‘नाराऽयण नाराऽयण’ असा घोष करीत देवर्षी नारद अवतरले. वाल्मीकींच्या विनंतीवरून त्यांनी महाकाव्याचा नायक म्हणून श्रीरामाचे त्यावेळेपर्यंतचे (राज्याभिषेकापर्यंतचे) संक्षिप्त चरित्र सांगितले. यापुढील चरित्रात स्वतः वाल्मीकी सहभागी होतील असा वर देऊन नारद निघून गेले.
नंतर ब्रह्मदेव नि वाग्देवी सरस्वती दोघेही आले आणि त्यांनी वाल्मीकींना प्रतिभेचे, लेखनशैलीचे वरदान दिले नि ते अंतर्धान पावले. हीच ती आगळीवेगळी घटना. पुढे वाल्मीकींनी शतकोटि प्रविस्तरम्‌‍ असं रामायण लिहिलं, हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
रामायणाच्या अवतरणाची ही सुरसरंजक कथा. यातून कोणते संस्कार घडवून घ्यायचे? संस्कार महान लोकांच्या वाणी-लेखणी-राहणीत दडलेले असतात.

  • संस्कार
  • क्रोध जिंकलेले वाल्मीकी ऋषी क्रोधाविष्ट होतात नि त्या शिकाऱ्याला शाप देतात. त्यांना शोक होतो त्यातून शाप बाहेर पडतो. शापाचा श्लोक बनतो नि श्लोकाचे बनते महाकाव्य! हे जरी खरे असले तरी निषादाला दिलेला शाप उरलाच ना? त्याला उःशापही दिला नाही. म्हणून राग हा काही झाले तरी वाईटच. आपण हळूहळू रागावर नियंत्रण आणायला शिकले पाहिजे.
  • तसेच ‘शापाच्या पोटात वरदान असते, तर वरदानाच्या पोटात शाप’ हे अर्थातच कालांतराने लक्षात येते.
  • कोणतीही घटना अकारण घडत नाही. काळाच्या ओघात घटनेला अनुसरून गोष्टी घडत राहतात. हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा प्रभाव रामायणरूपाने साऱ्या मानवजातीवर आजही पडतोय.
  • उत्स्फूर्तपणे उसळून वर आलेल्या उत्कट भावनातून काव्य प्रकटते (स्पाँटेनिअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज). अशा हर्षशोकादी भावनांचा आपण अनुभव घ्यायला हवा.
    दैवीशक्तीचा अवतार मानवाच्या उद्धारासाठी असतो. तसेच रामायणाचे अवतरण मानवजातीच्या उद्धरणासाठी आहे याचा अनुभव सर्वांना दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्रतेने येऊ लागलाय, हेही नसे थोडके!