चलो अयोध्या

0
26

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर दोन दिवस उसळलेल्या गर्दीच्या बातम्या देऊन प्रसारमाध्यमे आता इतर विषयांकडे वळली असतील, परंतु अयोध्येतील राममंदिराची कहाणी येथेच संपणारी नाही. ह्या मंदिरामुळे केवळ अयोध्येचेच नव्हे, तर संपूर्ण उत्तर प्रदेशचे अर्थकारण पालटणार आहे आणि त्या दृष्टीनेही ह्या मंदिराच्या उभारणीतून निर्माण झालेल्या अगणित शक्यतांकडे पाहणे जरूरी आहे. रामजन्मभूमी मंदिराची उभारणी ही कोट्यवधी भारतीयांसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची होती. राममंदिर नव्हे, तर राष्ट्रमंदिर म्हणूनच त्याकडे पाहिले गेले आणि जायला हवे, परंतु अयोध्येवर जे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये केंद्र व राज्य सरकारने विविध विकासकामांवर खर्च केलेले आहेत, ते केवळ तेवढ्यासाठी नाहीत. ह्या मंदिराच्या उभारणीमुळे पर्यटनदृष्ट्या प्रचंड उलथापालथ अपेक्षित आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवशी तब्बल पाच लाख लोकांनी रामललाचे दर्शन घेतले. प्रशासनाने गर्दी कमी करण्याचे आवाहन केल्याने तिसऱ्या दिवशी संख्या जरा घटली, परंतु ह्या मंदिराकडील हा ओघ यापुढे असाच निरंतर राहणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ समजावी. आजवर उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच काशी हे भारतीयांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र गणले जात असे. आयुष्याच्या उत्तरार्धात काशीयात्रा करायची मनीषा माणसे बाळगायची आणि ते मोक्षाचे द्वार मानले जायचे. मात्र, रामजन्मभूमी मंदिराबाबत तसे नाही. ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर अगदी छोट्या मुलांपासून तरुणांनादेखील अयोध्येला जाऊन एकदा हे मंदिर पाहण्याची ओढ लागून राहिलेली दिसते. म्हणजेच आध्यात्मिक पर्यटनाचा एक नवा अध्याय या मंदिराने सुरू केला आहे. आजवर तरुण पिढी अशा प्रकारच्या आध्यात्मिक पर्यटनापासून दूर राहत असे. मंदिरांची तीर्थयात्रा करायची ती हातपाय थकल्यावर अशी मानसिकता असे. परंतु हे चित्र आता बदलणार आहे. अयोध्येत वर्षाला किमान पाच ते दहा कोटी पर्यटक पाय ठेवतील असा अंदाज खुद्द सरकारने वर्तवलेला आहे. हे पर्यटक राज्यात विविध गोष्टींवर वर्षाला चार लाख कोटी रुपये खर्च करतील असेही गणित मांडण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारला केवळ करांपोटी मिळणाऱ्या महसुलातच त्यामुळे वीस ते पंचवीस हजार कोटींची वाढ होईल असे हे गणित सांगते. आजवर उत्तर प्रदेश म्हटले की आग्य्राचा ताजमहाल हा आकर्षणबिंदू होता. परंतु तो आता अयोध्येकडे सरकेल. अयोध्येत येणारे पर्यटक आग्रा, फतेहपूर सिक्री, लखनौ, काशी, मथुरेला गेल्यावाचून राहणार नाहीत आणि तेथे येणारे पर्यटक अयोध्येला जाणे टाळणार नाहीत. हे राममंदिर खुले होण्यापूर्वीच अयोध्येत विमानतळ आणि रेल्वेस्थानक खुले करण्याची दूरदृष्टी सरकारने दाखवली. अयोध्येतील हा विमानतळ दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे ख्रिस्ती समाजाचे पवित्र स्थान असलेली व्हॅटिकन सिटी आणि मुसलमानांची पवित्र मक्का मदिना या दोन्ही ठिकाणी जेवढे यात्रेकरू जातात, त्याहून अधिक भाविक आणि पर्यटक अयोध्येला पाय लावतील असे अभ्यासकांना वाटते आणि ते चुकीचे म्हणता येत नाही. रामनवमीसारख्या सणासुदीला तेथे गर्दीचे उच्चांक मोडले जातील. तोट्यात चाललेल्या हवाई क्षेत्राला अयोध्येतील विमानतळाने नवसंजीवनी दिली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. दिवाळखोरीकडे चाललेल्या विमान कंपन्यांना अयोध्या सावरील. अयोध्येचे रूपांतर स्मार्ट सिटीत करण्यात आले आहे. नवे हरित गृहप्रकल्प उभे राहात आहेत. अमिताभ बच्चनसारख्यांना तेथे निवृत्तीसाठी घर बांधावेसे वाटते आहे. त्यांनी भूखंड विकत घेतला आहे. देशातील आघाडीच्या हॉटेल कंपन्यांनी अयोध्या परिसरात हॉटेल उभारणीची तयारी चालवली आहे. अयोध्येत सध्या सतरा हॉटेल्स आहेत. आणखी 73 नवी हॉटेल्स उभी राहत आहेत व त्यातील 40 चे तर बांधकाम सुरू आहे. टूर ऑपरेटर्सनी अयोध्येच्या सहली आखायला सुरूवात केलेली आहे. पर्यटक गाईड, बोटिंग, टॅक्सी व इतर वाहने, उपाहारगृहे, दुकाने, स्मृतिचिन्हांचे विक्रेते ह्या सगळ्या आनुषंगिक व्यवसायांना तेथे बहर येईल. राममंदिराच्या नुसत्या प्रतिकृती आज कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जात आहेत. अर्थव्यवस्थेतील ही मोठी हालचाल एका मंदिराच्या निर्मितीतून झाली आहे. गुजरातमध्ये केवाडियात जेव्हा जगातील सर्वोच्च उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला, तेव्हा त्या ओसाड जमिनीत हा पुतळा कशाला असा सूर काहींनी लावला होता. आज तेथे अक्षरशः नंदनवन फुलवलेेले आहे. त्यातून स्थानिक आदिवासींना मोठा रोजगार मिळवून दिला गेला आहे. त्यामुळे हे मंदिर जे आर्थिक परिवर्तन घडवील त्याचीही नोंद नक्कीच घेतली गेली पाहिजे.