गोवा लवकरच बनेल ‘स्मार्ट राज्य’ : राज्यपाल

0
25

>> राज्याची सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी; 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

गोवा राज्य लवकरच देशातील मोजक्या स्मार्ट राज्यांपैकी एक होईल, असा विश्वास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलताना काल व्यक्त केला. गोवा विद्यापीठाच्या मैदानावर हा सोहळा आयोजित केला होता. राज्याची सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी सुरू असून, विश्वगुरू बनण्याच्या भारताच्या ध्येयाच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे, असेही राज्यपालांनी सांगितले.

भारताच्या संविधानाला जागतिक स्तरावर सर्वमान्यपणे स्वीकारले आहे. आपल्या समृद्ध परंपरांपासून प्रेरणा घेऊन जग आज भारताकडे कौतुकाने पाहत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. गोवा हे भारतातील स्मार्ट राज्य म्हणून प्रगती करीत असून, विविध पैलूंमध्ये प्रगती होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवीन झुआरी पूल, जी-20चे यश, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात गोव्याचा आदर्श दर्जा आणि पर्पल फेस्टचे यशस्वी आयोजन यासारख्या अनेक विकासात्मक कामगिरीवर प्रकाश टाकून राज्यपालांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची हमी म्हणून नागरिकांच्या शाश्वत दक्षतेच्या महत्त्वावर भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्यतेसाठी जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता सर्व लोकांना कठोर परिश्रम करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

राज्यपालांनी सुरुवातीला संचलनाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक विश्राम उमाकांत बोरकर यांना विशेष सेवेसाठी पोलीस राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय माहिती सचिव सुभाषचंद्र, आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्स, अजित रॉय, स्वेतिका सचन, आयपीएस ओमवीर सिंग, निधीन वालसन, अभिषेक धनिया, शिवेंदू भूषण, आयएफएस सौरभ कुमार, जॅबेस्टिन ए. यांना मुख्यमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. माहिती अधिकारी ऑल्विन परेरा यांनाही सन्मानित केले.