भारत विकसित करण्याची जबाबदारी तरुणांची ः मोदी

0
11

नवमतदारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

1947 च्या 25 वर्षे आधी देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी तरुणांवर होती. त्याचप्रमाणे, 2047 पर्यंत म्हणजेच पुढील 25 वर्षांत भारताला विकसित देश बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. आजच्या भारतात तुमचे नाव सुवर्णाक्षरात कसे लिहिले जावे हे तुम्हीच ठरवायचे आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काल 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम मतदान करणाऱ्या नवमतदारांशी व्हर्चुअलीपद्धतीने संवाद साधला. मोदींनी नवमतदारांना पुढच्या 25 वर्षांत तुम्हाला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवायचे आहे. स्थानिक, जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची जबाबदारी मोठी असेल असे सांगितले. आमचा वेग, दिशा आणि दृष्टीकोन काय असेल ते तुम्ही ठरवा. यासाठी मतदान हे प्रमुख माध्यम असेल. पुढील भारताचे भवितव्य उज्वल करण्यासाठी तुम्ही मतदान करणे महत्त्वाचे आहे. तुमचे एक मत आणि भारताच्या विकासाची दिशा जोडलेली आहे. तुमचे एक मत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तुमचे एक मत भारतातील डिजिटल क्रांतीला आणखी एक ऊर्जा देईल असे सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी, 18 ते 25 वर्षे वय असे असते जेव्हा एखाद्याचे जीवन अनेक बदलांचे साक्षीदार असते. या बदलांमध्ये तुम्हा सर्वांना जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सहभागी होण्याची जबाबदारी पार पाडायची आहे असे सांगितले. भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला असताना तुम्ही सर्वजण मतदार झाला आहात. 26 जानेवारीला देश आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. पुढील 25 वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची आहेत. असे सांगून मोदींनी, देशाचा विकास आणि तुमचे एक मत, दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. तुमचे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तुमचे एक मत डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देईल. तुमचे एक मत भारताला स्वबळावर अवकाशात घेऊन जाईल. तुमचे एक मत भारताची विश्वासार्हता वाढवेल असे प्रतिपादन केले.

देशातील तरुण मंडळी घराणेशाहीच्या विरोधात आहेत याचा मला आनंद होत असल्याचे सांगितले. इतर तरुणांना घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या पक्षांमध्ये कधीच पुढे जाता येत नाही. अशा पक्षांची विचारसरणी युवकविरोधी असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आज भारताच्या पासपोर्टकडे जगभरात अभिमानाने पाहिले जाते. तरुणांसाठी ही मोठी संधी असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.