>> विकसित गोवा, विकसित भारत संकल्पनेवर गोव्याचा चित्ररथ
>> नवी दिल्लीत भारत पर्वास प्रारंभ
प्रजासत्ताक दिनापूर्वी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक जल्लोषात बहुप्रतिक्षित ‘भारत पर्व’ लाल किल्ल्यावर, नवी दिल्ली येथे सुरू झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भावनेचा म्हणजेच विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि देशभक्तीचा उत्साह निर्माण करण्यासाठी आणि देशातील समृद्ध आणि विविध सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्यासाठी आयोजित केलेल्या भारत पर्वचे उद्घाटन केले.
भारत पर्व येथे ‘विकसित गोवा, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित गोव्याच्या चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये तपलोका योग क्षेत्र, गोव्याचे सागरी जीवन आणि जल जीवन मिशनचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्ररथ 31 जानेवारीपर्यंत 9 दिवसांच्या भारत पर्व दरम्यान प्रदर्शित केला जाईल. फोंड्यातील सुप्रसिद्ध कलाकार सुशांत खेडेकर यांनी गोव्यातील चित्ररथाची संकल्पना, सौंदर्यपूर्ण रचना तयार केली आहे.
गोव्याव्यतिरिक्त आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर यांनी भारत पर्वमध्ये त्यांचा चित्ररथ प्रदर्शित केला. याव्यतिरिक्त 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये कर्तव्यपथावर सादर झाल्यानंतर देशभरातील 16 राज्यांचा या संचलनासोबतच विविध केंद्रीय मंत्रालयांच्या 9 चित्ररथ भारत पर्वमध्ये प्रदर्शित केला जाणार आहेत.
खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकृती
राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 जवळ आणि एपीएस कॉलनी, दिल्ली कँट 10 येथे गोव्याच्या चित्ररथाच्या निर्मितीचे काम करण्यात आले. कलाकार श्री. खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुतार, डिझायनर आणि फॅब्रिकेटर्ससह 40 कारागीरांच्या चमूने चित्ररथाच्या निर्मितीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी चोवीस तास काम केले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने गोवा चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला आहे.
या वर्षी गोवा चित्ररथाच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त राज्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनाशी संबंधित माहितीवर प्रकाश टाकणारा मंडप उभारला आहे.